हिंदू त्यांच्या मुलांना धर्माभिमान बाळगण्याचे शिक्षण देत नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

  • सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात धर्मशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. गेली कित्येक वर्षे सनातन संस्थाही धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगत आहे. सरसंघचालकांनी मांडलेल्या विचारानंतर आतातरी हिंदूंच्या प्रत्येक संघटनेने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न केला पाहिजे. यातूनच हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण होऊन ते धर्माचरणीही बनतील ! – संपादक
  • सध्याची व्यवस्था ‘निधर्मी’असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देणे शक्य नाही. हिंदु राष्ट्रात हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची व्यवस्था सरकारी स्तरावरूनच केली जाईल. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा ! – संपादक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

डेहराडून (उत्तराखंड) – हिंदु कुटुंब स्वतःच्या मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांचे शिक्षण देत नाहीत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

सरसंघचालक यांनी मांडलेली सूत्रे

हिंदु मुले विवाहासाठी धर्मांतर करतात, ही मोठी चूक !

धर्मांतर कसे काय होते ? आपल्या देशातील मुले-मुली इतर धर्मांत कसे काय जातात ? छोट्या स्वार्थासाठी अथवा विवाह करण्यासाठी धर्मांतर करणे चुकीचे आहे.

‘ओटीटी’ मंचावर मुले काय पहातात, याकडे लक्षा द्या !

‘ओटीटी’ मंचावर सर्व काही पहायला मिळते. माध्यमांमध्ये जे येत आहे, ते मुलांसाठी आणि आपल्या मूल्यांची व्यवस्था टिकवण्यासाठी नसते. आपणच मुलांना घरात काय पहायला हवे आणि काय नको, हे शिकवण्याची आवश्यकता आहे.

(‘ओटीटी’ म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ ! आस्थापनांनी थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी दिलेली सेवा म्हणजे ‘ओटीटी’ असेही म्हणता येईल. ओटीटीद्वारे दर्शक चित्रपट, वेब सिरीज आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात.)

पाश्‍चात्त्यांमुळे देशात अमली पदार्थांची प्रकरणे वाढत आहेत !

लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांनी चीनमध्ये अफू पाठवले. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्‍चिमात्य देशांनी चीनवर राज्य केले. आपल्या देशातही हेच चालू आहे. अमली पदार्थांची प्रकरणे पाहिली आणि हे पदार्थ कुठून येतात, याचा आढावा घेतल्यास त्यांमागील कारण अन् उद्देश, तसेच त्याचा लाभ कुणाला होत आहे, हे तुम्हाला समजेल.

हिंदू संघटित होण्यासाठी महिलांचीही आवश्यकता !

हिंदु समाज संघटित करणे, हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य हेतू आहे; पण जेव्हा आम्ही संघाचे कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा आम्हाला केवळ पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल, तर यामध्ये ५० टक्के महिला असल्या पाहिजेत.

आपल्या मातीशी नाळ कायम ठेवायला हवी !

हिंदु कुटुंबांनी भाषा, भोजन, भजन, भ्रमण, भूषा आणि भवन या गोष्टींच्या माध्यमांतून आपल्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवली पाहिजे. आपली मुळे अधिक घट्ट केली पाहिजेत.