१. वर्ष २०२० मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त करायच्या गुरुपूजनाच्या विधींचा सराव करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. गुरुपौर्णिमेनिमित्त करायच्या गुरुपूजनाच्या विधींचा सराव (टीप) करतांना देहात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवणे आणि शांतीची अनुभूती येणे : ‘४.७.२०२० या दिवशी मला गुरुपौर्णिमेनिमित्त करायच्या गुरुपूजनाच्या विधींचा सराव करायचा होता. ‘हा सराव करणे’, हे दैवी नियोजन होते आणि माझ्यासाठी सराव करणे, म्हणजे दिव्यत्वाची अनुभूती घेण्यासारखेच होते. गुरुपूजनाचा सराव चालू असतांना ‘मी समोर बसून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पूजन करतांना बघत आहे’, असे मला जाणवत होते. मला माझ्या देहात त्यांचेच अस्तित्व जाणवत होते आणि शांतीची अनुभूती येत होती.
टीप : ‘पूजेची मांडणी आणि अन्य साहित्य कुठे ठेवल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सोयीस्कर होईल आणि चित्रीकरण उत्कृष्ट होईल’, या दृष्टीने मी गुरुपूजनाचा सराव केला.
१ आ. संकल्पामधील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या नावाचा उच्चार करतांना प्रचंड तेज आणि शक्ती जाणवणे अन् श्री गुरूंच्या आरतीच्या वेळी कृतज्ञताभाव जागृत होऊन शीतलता अनुभवायला येणे : गुरुपूजनातील संकल्प करण्याचा सराव चालू असतांना संकल्पातील शब्दांच्या उच्चार करतांना (हिंदु राष्ट्रासाठी आणि सर्व साधकांच्या रक्षणासाठी इ.) माझ्याभोवती अग्नीच्या ज्वाळांप्रमाणे उष्णता निर्माण झाल्याचे मला जाणवले. संकल्पातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या नावाचा उच्चार करतांना मला प्रचंड तेज आणि शक्ती जाणवत होती. श्री गुरूंच्या आरतीच्या वेळी माझा कृतज्ञताभाव जागृत झाला आणि मला शीतलता अनुभवायला मिळाली. ‘माझ्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या दिसत असून मी त्यांच्यासमोर बसून हे सर्व बघत आहे’, असे मला जाणवले.
१ इ. पूजाविधीच्या सरावाच्या वेळी व्यासपिठावर कुंकवाचा सुगंध येणे : या संपूर्ण पूजाविधीच्या सरावाच्या वेळी मला व्यासपिठावर कुंकवाचा सुगंध येत होता. काही वेळाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सरावाच्या ठिकाणी आल्या. तेव्हा मला एकाच वेळी दोन्ही ठिकाणी (स्वतःच्या ठिकाणी आणि व्यासपिठावर स्थुलातून) त्यांचे अस्तित्व जाणवले. त्या आल्यावर कुंकवाचा सुगंध यायचा थांबला. मी ही अनुभूती श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मलाही ‘मीच गुरुपूजनाचा सराव करत आहे’, असे वाटत आहे.’’
२. श्रीरामजन्मभूमी शिलान्यास सोहळ्यापूर्वी प्रभु श्रीरामचंद्राच्या छायाचित्राच्या पूजनाच्या सरावाच्या वेळी प्रभु श्रीरामचंद्राच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे आणि शांत अन् निर्विचार स्थिती अनुभवणे
श्रीरामजन्मभूमी शिलान्यास सोहळ्यानिमित्त करण्यात येणार्या प्रभु श्रीरामचंद्राच्या छायाचित्राच्या पूजनाच्या सरावाच्या वेळीही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या जागी उभी राहून पूजा आणि आरती यांचा सराव करतांना मी तशीच शांत अन् निर्विचार स्थिती अनुभवत होते. मला शक्तीची स्पंदने आणि आनंद अनुभवायला आला. मला प्रभु श्रीरामचंद्राच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच अस्तित्व जाणवत होते. मला श्रीरामाच्या गळ्यातील फुलांचा हार आणि त्यांचे चरण सजीव वाटत होते. त्या क्षणी मला माझे भान उरले नव्हते.’
– सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |