हिंदु धर्माला धोका नाही ! – माहिती अधिकारातील प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर

  • हिंदु धर्म धोक्यात असल्याच्या भाजपच्या नेत्यांच्या विधानावर माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांचा आक्षेप

  • केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागितली होती माहिती

देशात लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आदी संकटांमुळे हिंदू धोक्यात आहेत, ही वस्तूस्थिती जगजाहीर आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक !  – संपादक

गृहमंत्री अमित शहा

नागपूर – ‘हिंदु धर्माला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आणि त्यासंदर्भात कुठलेही ठोस पुरावे नाहीत’, असे स्पष्ट करून केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातील सर्व प्रश्न फेटाळून लावले आहेत. ‘हिंदु धर्म धोक्यात असल्याचे पुरावे द्यावेत’, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अखत्यारितील केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली होती.

जबलपुरे यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी माहिती अधिकार कायद्यांतर्गत हिंदु धर्माला धोका असल्याविषयीची माहिती मागितली होती. यावर गृह मंत्रालयाचे मुख्य माहिती अधिकारी (अंतर्गत सुरक्षा) व्ही.एस्. राणा यांनी वरील उत्तर दिले आहे.

‘माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती अधिकारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली किंवा कार्यकक्षेत येणारीच माहिती उपलब्ध करू देऊ शकतो. एखाद्या सूचनेची व्याख्या करणे किंवा अर्जदाराने उपस्थित केलेल्या समस्येचे समाधान करणे किंवा काल्पनिक प्रश्नांचे उत्तर देणे अपेक्षित नाही’, असे स्पष्ट करून ‘राणा यांनी ही गोष्ट काल्पनिक असल्याचे अधोरेखित केले आहे’, असा दावा जबलपुरे यांनी केला आहे.