श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधीची लूट, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम आहे ! – संपादक
मुंबई – कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवी हिचे प्राचीन दागिने, वस्तू अन् प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी पसार असलेले तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना वर्षभरानंतर तुळजापूर पोलिसांनी अटक केली, एवढेच पुरेसे नाही. देवीच्या खजिन्याच्या लुटीच्या प्रकरणाची व्याप्ती आणि कालखंड मोठा आहे. केवळ दिलीप नाईकवाडी हे एकटेच दोषी असण्याची शक्यता अल्प आहे. या प्रकरणाचा सूत्रधार, त्या काळात कार्यरत असणारे कनिष्ठ तथा वरिष्ठ शासकीय अधिकारी, तसेच या लुटीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असणार्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे ‘पोलीस आणि प्रशासन या सर्व भ्रष्टाचार्यांवर कारवाई कधी करणार ?’, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. २९ नोव्हेंबर २००१ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत दिलीप नाईकवाडी यांनी श्री भवानीदेवीचे अतीप्राचीन अलंकार, वस्तू, तसेच भाविकांनी अर्पण केलेले ३४८.६६१ ग्रॅम सोने आणि ७१६९८.२७४ ग्रॅम चांदीच्या वस्तू अन् ७१ प्राचीन नाणी यांची चोरी केली.
२. या प्रकरणी तक्रार करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करणारे तुळजापूर येथील पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांचे हिंदु जनजागृती समिती मनापासून अभिनंदन करते. अशी जागरूकता सर्वच भक्तांमध्ये असायला हवी.
३. दिलीप नाईकवाडी यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई व्हायला हवी. तसे झाल्यास देवीची संपत्ती लुटण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. पोलीस आणि प्रशासन यांनीही देवीच्या खजिन्यातील लुटलेल्या सर्व वस्तू, नाणी, दागदागिने पुन्हा प्राप्त होईपर्यंत कुणाच्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई चालूच ठेवावी.
४. यातील दोषींना वाचवण्याचा कितीही प्रयत्न झाला, तरी घोटाळेबाजांनी ‘भगवान के घर देर है; अंधेर नही ।’, हे लक्षात घ्यावे. ‘आदिशक्ती श्री तुळजाभवानी ही दुष्ट प्रवृत्तींना कठोर शिक्षा केल्याविना रहाणार नाही’, अशी आमची श्रद्धा आहे.
श्री तुळजाभवानी मंदिराच्या वर्ष १९९१ ते २००९ या काळातील शेकडो कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीने दिलेला लढा !१. हिंदु जनजागृती समितीने श्री तुळजाभवानी मंदिराच्या वर्ष १९९१ ते २००९ या काळातील शेकडो कोटी रुपयांचा दानपेटी आणि २६५ एकर भूमी घोटाळा यांविषयी सातत्याने वैध मार्गाने आवाज उठवला होता. यासाठी समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिकाही प्रविष्ट केली होती. २. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने वर्ष २०१७ मध्ये घोटाळ्याचा चौकशी अहवाल गृह विभागाला सादर केला; मात्र त्यात कोण दोषी आहे आणि कुणावर कारवाई केली, ते अद्यापही उघड झालेले नाही. यातील दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले. विधानभवनात आमदारांची आंदोलने झाली, तसेच राज्यभर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही अनेक आंदोलने केली; मात्र शासनाने या प्रकरणी संवेदनशील का दाखवली नाही ? अशा प्रकरणांतून ‘मंदिर सरकारीकरणामुळे मंदिराची कशा प्रकारे लूट होते’, हेच सिद्ध होते. |