सालसेत तालुक्यात खून, बलात्कार आणि चोर्‍या यांच्या प्रमाणात वाढ

कोरोना महामारीमुळे गेले जवळपास ६ मास संचारबंदी लागू असतांना गुन्ह्यांत वाढ कशी होते ? – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

मडगाव, १६ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यातील सालसेत तालुक्यात भ्रमणभाष हिसकावून पळवून नेणे, सोन्याच्या साखळ्या पळवून नेणे, अल्पवयीन मुलींवर बलात्कार, मटका  इत्यादींच्या प्रमाणात वाढ झाल्याने येथील नागरिकांकडून  चिंता व्यक्त केली जात आहे. या व्यतिरिक्त येथील कोलवा भागात दिवसाढवळ्या होणार्‍या बैलांच्या झुंजींविषयीही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जुलै मासात या तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये गळ्यातील सोन्याची साखळी पळवण्याची ८ प्रकरणे, भ्रमणभाष पळवल्याची काही प्रकरणे, बैलांच्या झुंजीची २ प्रकरणे, बलात्काराची १२ प्रकरणे आणि खुनाची ५ प्रकरणे यांची नोंद झाली आहे. या व्यतिरिक्त कोलवा समुद्रकिनार्‍यावर कॅसिनोचा जुगार चालू असतो. या तालुक्यातील मडगाव, कुडतरी, नेसाई, बाणावली, आर्लेम या भागात वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमणभाष पळवून नेण्याचे प्रकार दिवसाढवळ्या घडत आहेत. कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याची साखळी पळवून नेल्याच्या ४ प्रकरणांची नोंद झाली आहे. याविषयी अन्वेषण करून चोरांच्या २ टोळ्या कह्यात घेतल्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, तसेच सालसेत तालुक्यात अजूनही काही टोळ्या कार्यरत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैलांच्या झुंजी आयोजित केल्या जातात, हा विषय चर्चेत आहे. पोलीस बैलांची झुंज आयोजित केल्याच्या ठिकाणी पोचण्यापूर्वीच आयोजक पळून जातात आणि पोलिसांना रिकाम्या हाताने परत यावे लागते. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी सालसेत तालुक्यात पोलिसांची गस्त वाढवण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली आहे. सालसेत तालुक्यातील हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.