इंदूर येथे ‘अनिवार्य’ संस्थेने बसवलेल्या श्री गणेशमूर्तीच्या हातात ‘सॅनिटरी नॅपकीन’ ठेवून महिलांमध्ये जागृती करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने हिंदू कोणत्या थराला जाऊन देवतांचा अवमान करत आहेत, हे लक्षात येते ! – संपादक
  • हिंदूंना आतापर्यंत हिंदूंच्या संघटना, धार्मिक संघटना, धर्मगुरु आदींनी धर्मशिक्षण न दिल्याचाचा हा परिणाम आहे. अन्य धर्मियांना धर्मशिक्षण मिळत असल्याने ते कधीही स्वतःच्या श्रद्धास्थानांचा अवमान करत नाहीत उलट कुणी प्रयत्न केला, तर थेट कायदा हातात घेतात ! – संपादक
  • मासिक पाळीविषयी जागृतीच निर्माण करण्यासाठी हिंदूंच्या देवताच सापडल्या का ? अन्य काही नव्हते का ? अशा प्रकारची कृती सवंग लोकप्रियतेसाठीच केली असल्याचे दिसून येते ! मध्यप्रदेशातील भाजप सरकारने या प्रकरणी स्वतःहून गुन्हा नोंदवून अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा ! – संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

इंदूर (मध्यप्रदेश) – जिल्ह्यातील महू शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘अनिवार्य’ नावाच्या एका खासगी संस्थेकडून श्री गणेशमूर्ती बसवण्यात आली आहे. या मूर्तीच्या हातामध्ये महिलांच्या मासिक धर्माच्या वेळी वापरत असलेले ‘सॅनेटरी नॅपकिन’ असल्यामुळे हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे. ‘मासिक पाळीविषयीच्या जागृतीसाठी असे करण्यात आले आहे’, असे सांगत संस्थेकडून या हिंदुद्रोही कृत्याचे अश्‍लाघ्य समर्थन केले आहे. (मासिक पाळीच्या वेळी जागृती करण्यासाठी विविध माध्यमे आहेत. त्याचा वापर न करता हिंदूंच्या देवतांचा वापर करणे आणि त्याचे अश्‍लाघ्य समर्थन करणे, हा धर्मद्रोह होय ! – संपादक) ‘श्री गणेशाला एक उत्तरदायी पती या रूपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे’, असेही या संस्थेचे म्हणणे आहे. (श्री गणेश उत्तरदायी पती आहे, हे दाखवण्यासाठी त्याच्या हातात ‘सॅनिटरी नॅपकीन’ देण्याची काय आवश्यकता ? या संस्थेने गणेशोत्सवाच्या काळात गणेश पुराण आदी ग्रंथ वाचायचे नियोजन केले असते, तर श्री गणेशाचे विविध गुण समाजाला समजले असते. स्त्रीमुक्ती आणि पुरोगामित्व यांची हवा डोक्यात शिरल्यामुळेच ‘अनिवार्य’ संस्था अशी बिनबुडाची वक्तव्ये करत आहे ! – संपादक) या श्री गणेशमूर्तीच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी या देवींना दाखवण्यात आले आहे. याविषयी हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे. सामाजिक माध्यमांतून हिंदूंकडून विरोध केला जात आहे.

या संस्थेचे संस्थापक आणि लेखक अंकित बागडी यांनी सांगितले, ‘बाहुबली’ हा चित्रपट यशस्वी झाल्यामुळे श्री गणेशाला ‘बाहुबली’ पात्राच्या रूपात दाखवण्यात आले होते. त्या वेळी श्री गणेशचतुर्थीचा वापर मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी करावा, असा विचार आला. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तर स्त्रीस्वातंत्र्यासाठी काही तरी करावे, असा विचार केला. (स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदुद्रोह करणारे असे हिंदू हिंदु धर्माचे खरे वैरी ! – संपादक)