मध्यप्रदेशात कला शाखेच्या अभ्यासक्रमामध्ये रामचरितमानस, महाभारत, योग, ध्यान आदी शिकवले जाणार !

‘रामसेतूची निर्मिती’ या विषयाच्या अंतर्गत भगवान श्रीरामांच्या अभियांत्रिक ज्ञानाची माहिती दिली जाणार !

  • मध्यप्रदेश शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! भाजपशासित प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही असा निर्णय घेतला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
  • हिंदुद्वेष्ट्यांकडून मध्यप्रदेश शासनाच्या या निर्णयावर ‘शिक्षणाचे भगवेकरण’ असे आरोप केले गेल्यास आश्‍चर्य वाटू नये. अर्थात् शासनाला असा कितीही विरोध झाला, तरी त्याने मागे हटू नये. भारतातील १०० कोटी हिंदु जनता मध्यप्रदेश शासनाच्या पाठीशी आहे, हे त्याने लक्षात घ्यावे.
डावीकडून दुसऱ्या स्थानी उच्चशिक्षण मंत्री मोहन यादव

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील ‘शिक्षण धोरण २०२०’ अंतर्गत महाविद्यालयांतील अभ्यासक्रमामध्ये पालट करण्यात आला आहे. कला शाखेच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाभारत, रामचरितमानस, योग आणि ध्यान यांसंदर्भात शिकवले जाणार आहे.

१. नवीन अभ्यासक्रमानुसार ‘श्री रामचरितमानस अप्लाइड फिलॉसॉफी’ (श्री रामचरितमानसचे प्रायोगिक तत्त्वज्ञान) हा पर्यायी विषय म्हणून ठेवण्यात आला आहे. याअंतर्गत इंग्रजीच्या फाऊंडेशन कोर्समध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी. राजगोपालचारी यांनी लिहिलेली महाभारताची प्रस्तावना शिकवली जाणार आहे. इंग्रजी आणि हिंदी यांच्यासमवेत योग अन् ध्यान या दोन विषयांना तिसर्‍या फाऊंडेशन कोर्सच्या रूपामध्ये शिकवले जाणार आहे, असेही राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

२. श्री रामचरितमानसच्या अंतर्गत असणार्‍या धड्यांमध्ये ‘वेद, उपनिषदे आणि पुराणांचे ४ युग’, ‘रामायण आणि श्री रामचरितमानसमधील भेद’ आणि ‘दिव्य अस्तित्वाचा अवतार’ हे विषयही शिकवले जाणार आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार हे विषय व्यक्तीमत्त्व, विचार आणि चारित्र्य अधिक सक्षम बनवण्यासाठी शिकवण्यात येणार आहेत. प्रभु श्रीरामचंद्र हे आज्ञाधारी पुत्र कसे होते, यासंदर्भातही विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.

३. प्रभु श्रीरामचंद्र हे किती कुशल अभियंता म्हणजेच इंजीनियर होते, याचेही शिक्षण दिले जाणार आहे. ‘रामसेतूची निर्मिती’ या विषयाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना भगवान श्रीरामांकडे असणार्‍या अभियांत्रिक ज्ञानाची माहिती करून दिली जाणार आहे.

४. श्री रामचरितमानस समवेत २४ पर्यायी विषय देण्यात आले असून यांमध्ये मध्यप्रदेशातील उर्दू गाणी आणि उर्दू भाषा यांचाही समावेश आहे.

विद्यार्थ्यांना महान व्यक्ती म्हणून विकसित करायचे आहे ! – उच्चशिक्षण मंत्री मोहन यादव

उच्चशिक्षण मंत्री मोहन यादव

मध्यप्रदेशचे उच्चशिक्षण मंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, अशा शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना ‘सन्मान देणे म्हणजे काय ?’ आणि इतर मूल्यांसमवेतच जीवनामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. आता आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचे नाही, तर त्यांना महान व्यक्ती म्हणून विकसित करायचे आहे.

बायबल, कुराण आणि गुरु ग्रंथसाहिब हेही शिकवावे ! – काँग्रेस

यातून काँग्रेसला ती किती धर्मनिरपेक्ष आहे, हे दाखवायचे नसून तिला मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे लांगूलचालन करायचे आहे, हेच स्पष्ट होते !

काँग्रेसचे नेते पी.सी. शर्मा यांनी याविषयी म्हटले की, अभ्यासक्रमामध्ये महाभारत, गीता आणि रामचरितमानस शिकवण्याला आमचा काहीच विरोध नाही; मात्र विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सद्भाव विकसित करण्यासाठी त्यांना बायबल, कुराण अन् गुरु ग्रंथसाहिब यांसारखे धार्मिक ग्रंथही शिकवले पाहिजेत; मात्र असे ते (सत्ताधारी भाजप) करणार नाहीत; कारण ते त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे.