अमरावती येथे बनावट बियाणांमुळे २०० हेक्टरवरील मिर्ची खराब !

शेतकर्‍यांना फसवणार्‍या आस्थापनांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! शेकडो शेतकरी आर्थिक हानीमुळे आत्महत्या करत असतांना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे संकटग्रस्त असतांना शेतकर्‍यांना बनावट बियाणे देऊन त्यांना फसवणारी आस्थापने त्यांच्या जिवाशीच खेळत आहेत ! बोगस बियाणांमुळे शेतकर्‍यांची हानी होऊन त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले तर त्यासाठी या आस्थापनांना उत्तरदायी ठरवावे लागेल !

शेतकर्‍यांची बियाणे आस्थापनांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची चेतावणी

अमरावती – जिल्ह्यातील वरूड मोर्शी तालुक्यातील संत्री उत्पादक शेतकरी संत्री गळतीमुळे संकटात आहेत. त्यातच वरूड तालुक्यातील शेकडो मिर्ची उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या संकटात सापडलेले आहेत. शेतात लावलेले मिर्चीचे बियाणे बनावट निघाले आहे. त्यामुळे मिर्चीच्या झाडांची वाढ खुंटली आहे. उत्पादनही शून्य आहे, असा गंभीर आरोप शेतकर्‍यांनी बियाणे आस्थापनांवर केला आहे. जवळपास २०० हेक्टरवरील मिर्ची पीक हातातून गेल्याने शेतकर्‍यांनी बियाणे आस्थापनांच्या विरोधात थेट कृषीमंत्री दादाभुसे यांच्याकडे तक्रार केली आहे. हानीभरपाई न दिल्यास, आस्थापनांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी संतप्त मिर्ची उत्पादक शेतकर्‍यांनी दिली आहे. (गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांना बनावट बियाणे दिल्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे पीक खराब झाले आहे. याविषयी शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे याकडे कृषीमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन शेतकर्‍यांना त्यांची हानीभरपाई मिळवून द्यावी, तसेच बनावट बियाणे देणार्‍या आस्थापनांवर कठोर कारवाई करावी, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. – संपादक)