हिंगोली – ‘जिल्ह्यात सण उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, असा आदेश पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाणेदारांना दिले आहेत. याशिवाय गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कलासागर यांनी जिल्ह्यातील ठाणेदारांना सूचना केल्या आहेत. याशिवाय गणेशोत्सव मंडळांनाही आवाहन केले आहे.
राकेश कलासागर पुढे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकडे ठाणेदार यांनी लक्ष द्यावे, तसेच गणेशोत्सव मंडळांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत. या परिसरात जुगार अड्डे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यासाठी गणेशोत्सव मंडळांनीही सतर्क रहाणे आवश्यक आहे.