पर्यावरणपूरक स्पर्धेतून दिशाभूल !

प्रतिकात्मक छायाचित्र

लहानपणापासून मुलांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जागृती निर्माण करण्याच्या नावाखाली पुणे महानगरपालिका, ‘कमिन्स इंडिया फाऊंडेशन’ आणि ‘जनवाणी’ यांनी पुढाकार घेऊन ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२१’ आयोजित केली आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, सजावट, गणेशमूर्ती विसर्जन, निर्माल्यापासून खतनिर्मिती, गणेशोत्सवाची १० कुटुंबांमध्ये जनजागृती करणे असे स्पर्धेतील विजेत्याच्या निवडीसाठीचे निकष आहेत. इथे प्रदूषण टाळण्याच्या नावाखाली ‘पर्यावरणपूरक’ म्हणतांना कागदाचा उपयोग, मूर्तीदान आदी चुकीच्या उपाययोजना सुचवल्या जातात आणि त्या धर्मशास्त्राशी पूर्णतः विसंगत होत असल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होतात.

पुणे महापालिका गणेशोत्सवात प्रतिवर्षी जणू धर्मविरोधी भूमिका रेटण्याचा विडा उचलल्याप्रमाणे वागते. गत वर्षी प्रत्येक गणेशमूर्ती विक्रेत्यास एका गणेशमूर्तीसह १ किलो अमोनियम बायकार्बोनेट देण्याचे आदेश दिले होते, तसेच वसाहतींमध्येही पालिकेच्या वतीने अमोनियम बायकार्बोनेट देण्यात आले होते. ‘ज्या पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली, तेथे आता सार्वजनिकरित्या हिंदूंचे श्रद्धाभंजन चालू आहे’, हे दुर्दैवी आहे. स्पर्धेचा व्यावसायिक हेतू साध्य करण्यासाठी केवळ हिंदूंचेच सण आणि धर्मभावना यांना ठेच का दिली जाते ? त्यामुळे गणेशोत्सव मंडळे आणि पालक यांनी पुढे येऊन याला विरोध करावा.

खरेतर हिंदूंचे सर्व सण हे पर्यावरणपूरकच आहेत. वृक्ष, नद्या, पशूपक्षी इतकेच काय दगडातही देव पहाणारी हिंदु संस्कृती आहे. मुळात शास्त्रानुसार मातीची मूर्ती पर्यावरणपूरकच असतांना असले निरर्थक प्रकार कशासाठी ? हे म्हणजे भंपक पर्यावरणवाद समाजात पसरवण्यासाठी मुलांना वेठीस धरण्यासारखे आहे. पर्यावरणाच्या नावाखाली मुलांवर धर्मविरोधी गोष्टी थोपवण्याचा हा प्रकार चालू आहे. ‘याला कायदेशीर आळा बसावा’, अशी सरकारकडे मागणी करण्याची आवश्यकता आहे. असे धर्मविरोधी उपक्रम राबवण्यापेक्षा मुलांना ‘धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्ती कशी असावी ?’, याची माहिती देऊन त्याप्रमाणे ती सिद्ध करण्यास प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून ही मुले लहानपणापासूनच शास्त्रानुसार आचरण करतील.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे