रुग्णालयांमध्ये ८० खाटा लहान मुलांसाठी राखीव
नवी मुंबई – सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नेरूळ आणि ऐरोली ही दोन्ही रुग्णालये कोरोना समर्पित करण्यात येणार आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. या रुग्णालयात सप्टेंबरपर्यंत प्राणवायूची क्षमता ८० टनापर्यंत करण्यात येणार आहे.
नवी मुंबईत सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ५० पेक्षा अल्प रुग्ण सापडत आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या ७२३ इतकी झाली आहे; पण दुसर्या लाटेतील अनुभव आणि तिसर्या लाटेची शक्यता पहाता पालिका प्रशासनाने सिद्धता केली आहे. यासाठी या दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी २०० खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तिसर्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने रुग्णालयांत प्रत्येकी ८० खाटा या लहान मुलांसाठी असणार आहेत.
मयूरेश चेंबर्स येथील ५८५ प्राणवायू खाटा आणि पोळ फाऊंडेशन येथील ५५० प्राणवायू खाटा यांची कामे तत्परतेने करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने ९३ टक्के प्राणवायूच्या साठ्याच्या क्षमतेचे नियोजन केले आहे.