पाकिस्तानी आणि ‘अफगाणी’ तालिबान !

संपादकीय

तालिबानचा वाढता धोका लक्षात घेता जागतिक समुदायाने संघटित होणे आवश्यक ! 

प्रतिकात्मक छायाचित्र

पाकमध्ये ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ही आतंकवादी संघटना वर्ष २००७ पासून शरीयतनुसार चालणारे राज्य स्थापन करण्यासाठी कारवाया करत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर तिचा प्रभाव आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानशी या संघटनेचा थेट संबंध नसला, तरी दोघांची विचारसरणी एकच आहे आणि ती म्हणजे शरीयतनुसार राज्यकारभार करणे. पाक इस्लामी देश असला, तरी तेथे शरीयतनुसार नाही, तर तेथील राज्यघटनेद्वारे राज्यकारभार केला जातो. कट्टरतावादी धर्मांधांना ते नको आहे. त्यामुळे अशा संघटनांचा त्याला विरोध असून ते शरीयतनुसार चालणारे राज्य आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच आता अफगाणी तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यावर तहरीक-ए-तालिबानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील कारागृहात बंद असलेल्या सहस्रो आतंकवाद्यांना मुक्त केले ज्यात तहरीक-ए-तालिबानचेही काही आतंकवादी होते. त्यामुळे या संघटनेला आणखी बळ मिळाले आहे. आता ती पाकमध्ये नव्याने कारवाया करण्यास सिद्ध झाली आहे. अफगाण तालिबान आणि पाक यांचे सख्य असल्याने अफगाण तालिबानने तहरीक-ए-तालिबानला चेतावणी दिली आहे. ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ जर आम्हाला नेता मानत असेल, तर आमचे म्हणणे त्यांनी ऐकले पाहिजे; मग ते योग्य असो कि नसो’, अशी चेतावणी तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने दिली आहे. त्याच वेळी त्याने ‘अफगाणिस्तानला नाही, तर पाकलाच ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेशी लढले पाहिजे. हे पाक आणि तेथील उलेमा यांच्यावर अवलंबून आहे, तालिबानवर नाही’, असेही स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ अफगाण तालिबानला हे नको आहे की, तहरीक-ए-तालिबानने पाकमध्ये काही कारवाया कराव्यात. या संघटनेने शांत बसावे. यातून अफगाणिस्तानातील तालिबान उघडपणे पाकला साहाय्य करत आहे, हे समोर आले आहे. आता तहरीक-ए-तालिबान यावर पुढे काय करणार, हे पहावे लागेल. तहरीक-ए-तालिबानलाही पाकवर राज्य करण्याची इच्छा असल्याने ती तालिबानचे किती ऐकेल हे पहावे लागेल. उद्या तालिबान आणि पाकचे सैन्य यांनी तहरीक-ए-तालिबानच्या विरोधात कारवाई करण्यास चालू केले, तर ‘तिचा त्यांच्यासमोर निभाव लागेल का ?’ याचाही विचार ती करत असणार. यातून असे लक्षात येते की, अफगाणिस्तानातील तालिबान संघटनेला शरीयतविषयी विशेष आपुलकी नाही, तर तिला सत्ता हवी आहे. त्यासाठी जो कुणी तिला साहाय्य करील तो तिचा मित्र असणार आहे. त्यामुळे तहरीक-ए-तालिबानही पाकमध्ये शरीयतनुसार राज्य आणू इच्छित असला, तरी पाक तालिबानला साहाय्य करत असल्याने तालिबान कधीही तहरीक-ए-तालिबानला पाकमध्ये कोणत्याही कारवाया करण्यास साहाय्य करणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आतंकवादी संघटनांमध्ये कितीही अंतर्गत मतभेद असले, तरी ते ‘काफीर’ भारताच्या विरोधात एकत्र येतात, हाही इतिहास आहे. त्यामुळे भारताने अखंड सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

पाकच्या अणूबाँबचा धोका !

प्रतिकात्मक छायाचित्र

अमेरिकेने अफगाणिस्तानच्या सैन्याला मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा दिला होता, तसेच सैन्याला प्रशिक्षणही दिले होते; मात्र या सैन्याने कच खाल्ल्याने तिचा पराभव झाला आणि अफगाणिस्तान तालिबानच्या कह्यात गेला. त्यानंतर अमेरिकेने जो काही शस्त्रसाठा दिला होता, त्यावर आता तालिबानचे नियंत्रण आहे. तालिबानला ही लॉटरीच लागली आहे. जगातील अत्याधुनिक अशी लढाऊ हेलिकॉप्टर्स, टँक आणि अन्य शस्त्रे तालिबानला मिळाल्याने त्याची शक्ती प्रचंड वाढली आहे. असा ‘अफगाणी’ तालिबान उद्या शेजारील राष्ट्राच्या विरोधात उभा ठाकला, तर त्याला पराजित करणे अवघड होऊ शकते. सध्या पाकिस्तानकडे १५० हून अधिक अणूबाँब आहेत, असे सांगितले जात आहे. ‘अफगाणी’ तालिबानचे लक्ष या बाँबवर असल्याचेही वृत्त प्रसारित झाले आहे. यापूर्वी पाकमधील आतंकवादी संघटनांचेही या अणूबाँबवर लक्ष असल्याचे सांगितले जात होते. आता तालिबानचेही लक्ष असल्याचे म्हटले जाणे चिंताजनक आहे. दुसरीकडे चीनचे लक्षही पाकवर आहे. सध्यातरी ‘अफगाणी’ तालिबानला पाक सैन्याचे पुरेपूर साहाय्य मिळत आहे. त्यामुळे तो पाकच्या विरोधात कधीच कारवाई करणार नाही, असे म्हटले जात आहे; मात्र पाकच्या विविध प्रांतांमध्ये संघर्ष चालूच आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात उठाव केला आणि तो पाक सैन्याला निस्तरता आला नाही, तर तो ‘अफगाणी’ तालिबानचे साहाय्य घेईल आणि पाकच्या अणूबाँबवर नियंत्रण मिळवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. उद्या चीन, पाक आणि तालिबान एकत्र आले अन् त्यांनी अमेरिका, भारत आणि युरोपीय राष्ट्रे यांच्या विरोधात आघाडी उघडली, तर तिसरे महायुद्धच चालू होईल. याचाच अर्थ आता जे काही अफगाणिस्तानमध्ये चालू आहे, ते जगासाठी कुठल्या ना कुठल्या कारणाने धोकादायक आहे. त्यासाठी जगाने संघटित होऊन त्याचा विरोध करणे आणि तालिबानला, तसेच पाकला ठेचणे आवश्यक आहे; मात्र सध्या जागतिक राजकारणात कुणीही तालिबानच्या विरोधात आणि समर्थनार्थ बोलण्याचे टाळत आहे. भारतानेही सावध भूमिका घेतली आहे. काही देश कुंपणावर आहेत आणि ते कदाचित् तालिबानला मान्यताही देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे जगासाठी धोकादायक ठरणार आहे. याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जागतिक समुदायाने एकत्र येऊन हे संकट येण्यापूर्वीच ते रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत अन्यथा मोठा विध्वंस होऊ शकतो. भारतानेही यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक आहे; कारण भारत या संकटाचा शिकार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.