सावंतवाडी – आजही सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या दृष्टीने ‘रेड झोन’मध्ये आहे. अशा कोरोनाच्या संकटकाळात जनआशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणे येथील जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, अशी टीका शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेवर केली. आमदार केसरकर त्यांच्या येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. या ठिकाणची शांतता अबाधित रहाणे आवश्यक आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत:ची भूमिका पालटावी अन्यथा जिल्ह्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांच्या विरोधात माझा राजकीय संघर्ष अटळ आहे. या शांततेचा भंग कुणी करत असेल, तर पुन्हा एकदा मी राजकीय संघर्षासाठी सिद्ध आहे. माझा राजकीय इतिहास रक्तरंजित नाही. त्यामुळे नीतीच्या तत्त्वावर आधारित संघर्ष मी करीन. याविषयीची भूमिका १७ सप्टेंबर नंतर स्पष्ट करणार आहे.’’
या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा उपसंघटक शब्बीर मणियार आदी उपस्थित होते.