आतंकवाद्यांना शोधून ठार करा ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा सैन्याला आदेश

काबुल विमानतळाबाहेरील बॉम्बस्फोटाचे प्रकरण

  • अमेरिकेचे १३ सैनिक ठार

  • ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ने घेतले बॉम्बस्फोटाचे दायित्व !

वॉशिंग्टन (अमेरिका) – काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर २६ ऑगस्टला इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या २ बॉम्बस्फोटांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात अमेरिकेच्या १३ सैनिकांचाही समावेश आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकी सैन्याला आतंकवाद्यांना शोधून त्यांना ठार करण्याचा आदेश दिला आहे. या स्फोटात जवळपास १५० हून अधिक जण घायाळ झाले आहेत, तर ‘आमच्या (तालिबान) सैन्याचे २८ जण ठार झाले आहेत’, असे तालिबाननेही म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इस्लामिक स्टेट विजयी होणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत अमेरिकी नागरिकांना आणि इतरांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढणार आहोत. आमची मोहीम चालूच रहाणार आहेे. या भ्याड आक्रमणांना अमेरिका घाबरणार नसून आम्ही आतंकवाद्यांना शोधणार आणि त्यांचा नायनाट करणार ! दुसरीकडे बॉम्बस्फोटाचे दायित्व हे ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले आहे.

विमानतळावरील आक्रमणामागे इस्लामिक स्टेट, तालिबानी आणि हक्कानी नेटवर्क ! – अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांचा दावा

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह

काबुल विमानतळाबाहेरील आक्रमणाविषयी अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी दावा केला आहे की, इस्लामिक स्टेट, तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांचे लागेबांधे आहेत. सालेह यांनी ट्वीट करून म्हटले की, आमच्याकडे असलेल्या पुराव्यानुसार, ‘इस्लामिक स्टेट खुरासान’च्या आतंकवाद्यांची मुळे तालिबान आणि विशेषत: हक्कानी नेटवर्क यांच्याशी जुळलेली आहेत. तालिबान ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ समवेतच्या संबंधांना फेटाळून लावत आहे; मात्र ज्या प्रमाणे पाकिस्तान तालिबानच्या ‘क्वेटा शूरा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध नसल्याचे म्हणतो, तसेच तालिबानही इस्लामिक स्टेटशी असलेले त्याचे संबंध नाकारत आहे. तालिबान स्वतःच्या मार्गदर्शकाकडून (पाकिस्तानकडून) बरेच काही शिकला आहे.

काय आहे ‘इस्लामिक स्टेट खुरासान’?

‘इस्लामिक स्टेट खुरासान’ ही मध्य आशियातील इस्लामिक स्टेटची सहकारी आतंकवादी संघटना आहे. इस्लामिक स्टेटचे आतंकवादी वर्ष २०१४ मध्ये सीरिया आणि इराक येथे पसरले होते. त्यानंतर काही मासांनी ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ची स्थापना झाली. ‘खुरासान’ म्हणजे उत्तर पूर्वी इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांचा भूप्रदेश ! प्रारंभी या संघटनेमध्ये शेकडो पाकिस्तानी तालिबानी भरती झाले. पाकच्या सैन्याने मोहिमा राबवून या आतंकवाद्यांना देशाबाहेर काढले. त्यानंतर या आतंकवाद्यांनी सीमालगतच्या भागात आश्रय घेतला. कट्टरतावाद्यांनी संघटनेला अधिक बळकटी दिली. तालिबानमधील काही नाराज आतंकवाद्यांनीदेखील या संघटनेत प्रवेश केला आहे.

इस्लामिक स्टेटने जगाचे २० भाग केले आहेत. त्यांमध्ये इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया, इस्लामिक स्टेट गाझा, इस्लामिक स्टेट ऑफ लिबिया असे प्रकार आहेत. तशाच प्रकारे ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ असून इस्लामिक स्टेटने ‘ग्रेटर खुरासान’ म्हणूनही एक भूप्रदेश घोषित केला आहे. यामध्ये खुरासानमधील देशांसमवेतच भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश करण्यात आला आहे.