जिहादी आतंकवादी संघटना तालिबानचा इतिहास

सध्या तालिबानने अफगाणिस्तानच्या (राजधानी काबुलसह) संपूर्ण भूभागावर नियंत्रण मिळवले आहे. आता त्या ठिकाणी शरियत कायद्यानुसार कारभार चालू झाला आहे. एका आतंकवादी संघटनेच्या कह्यात संपूर्ण देश जाण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वीही अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण होते. या आतंकवादी संघटनेचा इतिहास जाणून घेऊया.

 

तालिबानी आतंकवादी

१. तालिबान एक सुन्नी इस्लामी आंदोलन होते. त्याचा प्रारंभ वर्ष १९९४ मध्ये दक्षिण अफगाणिस्तानमध्ये झाला. ‘तालिबान’ हा मूळ अरबी शब्द ‘तालिब’वरून आला आहे. ‘तालिब’चा अर्थ ‘ज्ञान मिळवण्याची अपेक्षा करणारे आणि इस्लामी कट्टरतावादावर विश्वास ठेवणारे विद्यार्थी’, असा आहे. ‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान.’ ‘तालिबान’चा अर्थ ‘मागणारे’ असा होतो. ‘तालिबान एक राजकीय आंदोलन आहे’, असे सांगण्यात येत असल्याने त्याची सदस्यता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील मदरशांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना मिळते. तालिबान ही आतंकवादी संघटना प्रारंभी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आणि मदरसे यांद्वारे भक्कम होत गेली. त्यासाठी त्याला सौदी अरेबियातून सर्वाधिक पैसे येत होते. वर्ष १९९६ ते २००१ पर्यंत अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे शासन असतांना तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर होता. त्याने स्वतःला ‘हेड ऑफ सुप्रिम काऊन्सिल’ (सर्वाेच्च परिषदेचा अध्यक्ष) असे घोषित केले होते. तालिबान आंदोलनाला सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि पाकिस्तान या इस्लामी देशांनी  मान्यता दिली आहे.

२. १९९० च्या दशकामध्ये उत्तर पाकिस्तानमध्ये तालिबान अधिक शक्तीशाली झाला. त्या वेळी अफगाणिस्तानमधून सोव्हिएत संघाचे सैन्य माघारी जात होते. तेव्हा तेथे अनेक गटांमध्ये संघर्ष चालू झाला. अशा वेळी तालिबानचा तेथे प्रवेश झाल्यावर अफगाणी लोकांनी त्याचे स्वागत केले. तालिबानने सर्वप्रथम अफगाणिस्तानमधील भ्रष्टाचारावर लगाम घातला, तसेच अव्यवस्थेवर नियंत्रण मिळवले. तालिबानच्या नियंत्रणातील भाग लोकांसाठी सुरक्षित बनल्याने तेथे उद्योग व्यवसाय करता येऊ लागला.

३. सप्टेंबर १९९५ मध्ये तालिबानने इराणच्या सीमेवरील हेरात प्रांतावर नियंत्रण मिळवले. यानंतर अफगाणिस्तानच्या बुरहानुद्दीन रब्बानी सरकारला सत्ताच्युत करून राजधानी काबुलवर नियंत्रण मिळवले. वर्ष १९९८ पर्यंत तालिबानने अफगाणिस्तानच्या ९० टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले होते.

४. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर तेथे शरियत कायदा लागू करण्यात आला. या कायद्यानुसार गुन्ह्यांतील दोषींना सार्वजनिक ठिकाणी फाशी देणे, चोरी करणार्‍यांचे हात आणि पाय तोडणे आदी शिक्षा देण्यात येऊ लागल्या होत्या.

५. पुरुषांना दाढी ठेवण्याचा आणि महिलांनी बुरखा घालण्याचा आदेश देण्यात आला होता. १० वर्षांवरील मुलींना शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. दूरचित्रवाणी, चित्रपट आणि संगीत यांवरही निर्बंध घातले गेले.

६. अफगाणिस्तानमधील बामियान येथील बौद्धांच्या मूर्ती तोफगोळे डागून फोडण्यात आल्या.

७. २४ डिसेंबर १९९९ या दिवशी भारताच्या ‘इंडियन एअरलाईन्स’चे विमान जिहादी आतंकवाद्यांनी अपहरण करून अफगाणिस्तानच्या कंदहार येथे नेण्यात आल्यावर त्याला तालिबान सरकारकडून संरक्षण देण्यात आले होते.

८. अल् कायदाच्या आतंकवाद्यांनी वर्ष २००१ मध्ये अमेरिकेवर विमानांद्वारे केलेल्या  आक्रमणानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. तालिबानवर अल् कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला आश्रय दिल्याचा आरोप करत अमेरिकेने हे आक्रमण केले आणि अफगाणिस्तानमधून तालिबानची सत्ता संपुष्टात आणली.

९. गेली २० वर्षे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे सैन्य होते. या काळात अफगाणी नागरिकांचे सरकार स्थापन करण्यात आले. तरीही अमेरिका अफगाणिस्तानमधून तालिबानचा पूर्ण नायनाट करू शकली नाही.

१०. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार असतांना त्यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार अमेरिकेचे सैन्य माघारी जात असतांना तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर संपूर्ण नियंत्रण मिळवले आहे.

(संदर्भ : सामाजिक माध्यम)