दोडामार्ग तालुक्यात रस्त्यांची निकृष्ट कामे करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठीचे उपोषण दुसर्‍या दिवशी चालू

अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने निकृष्ट कामे ! – बाळा नाईक, भाजप

दोडामार्ग – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही तालुक्यातील रस्त्यांची कामे निकृष्ट झाली आहेत. याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी भाजपचे पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसभापती लक्ष्मण उपाख्य बाळा नाईक यांनी १५ ऑगस्टला येथील तहसील कार्यालयासमोर चालू केलेले उपोषण १६ ऑगस्ट या दिवशीही चालू ठेवले. ‘येत्या २ दिवसांत योग्य तो निर्णय न झाल्यास १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू’, अशी चेतावणी नाईक यांनी दिली आहे. (दोडामार्ग तालुक्यातच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक रस्त्यांची कामे सुमार दर्जाची झाली आहेत. नवीन रस्ते पहिल्याच पावसात खराब होणे, रस्त्याची बाजूपट्टी आणि पूल खचणे, असे प्रकार घडत आहेत. या सर्वांना कर्तव्याची जाणीव नसलेले ठेकेदार आणि विकासकामे चालू असतांना लक्ष न ठेवणारी प्रशासकीय यंत्रणा उत्तरदायी आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरेल का ? – संपादक)

पंतप्रधान ग्रामीण सडक योजना आणि आताची मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना या अंतर्गत वर्ष २०१५ ते २०२१ या ६ वर्षांच्या काळात दोडामार्ग तालुक्यात झालेल्या  आणि सध्या प्रगतीपथावर असलेल्या रस्त्यांची  कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने त्यांची ‘क्वालिटी कंट्रोल’ विभागाकडून तपासणी करावी, तसेच ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने कामे केली जातात अन् त्याच त्या ठेकेदारांना कामे देण्याकडे अधिकार्‍यांचा कल असतो. शासन रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते; तरीसुद्धा रस्त्यांची कामे दर्जाहीन होतात. जर एखाद्या कामाची तक्रार केली, तर त्याची नोंदही अधिकारी घेत नाहीत. संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि तहसीलदार यांनी संयुक्त पहाणी करावी अन् रस्ते वाहतुकीस योग्य कसे आहेत, हे दाखवून द्यावे, असे आव्हान नाईक यांनी प्रशासनाला दिले आहे.