अमेरिका अफगाणिस्तानच्या दूतावासातील कर्मचार्‍यांना परत आणण्यासाठी ३ सहस्र सैनिक पाठवणार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अफगाणिस्तानमध्ये तालिबान अधिकाधिक प्रांत कह्यात घेत असल्याच्या भीतीने अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या नागरिकांना बाहेर काढण्याची सिद्धता केली आहे. यासाठी अमेरिका तिचे ३ सहस्र सैनिक अफगाणिस्तानात परत पाठवत आहे. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, सैनिकांना दीर्घ काळासाठी नव्हे, तर तात्पुरत्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात येत आहे.
अमेरिकेचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानातून दूतावासात काम करणार्‍या ५ सहस्र ४०० लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहोत. यांपैकी सुमारे १ सहस्र ४०० अमेरिकी नागरिक आहेत. दूतावासात काम करणार्‍या आमच्या लोकांची सुरक्षा सुनिश्‍चित करण्यासाठी आम्ही सतत परिस्थितीचा आढावा घेत आहोत.