खनिकर्म विभागाने आश्वासन देऊनही रेडी गावातील खनिजयुक्त पाण्यामुळे ५ वर्षांपूर्वी हानी झालेल्या शेतकर्‍यांना अद्याप हानीभरपाई नाही !

हानीभरपाई मिळण्यासाठी स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार ! – भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग

वेंगुर्ला – तालुक्यातील रेडी येथील खाण आस्थापनाने दायित्वशून्य आणि मनमानीपणे तेथील शेतकर्‍यांच्या खासगी भूमीत खनिजयुक्त चिखलाचे पाणी सोडल्याने ८ – ९ एकर शेतभूमी नापिक झाली आहे. त्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाच्या निधीतून या शेतकर्‍यांना हानीभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी २६ जानेवारी २०२१ या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी खनिकर्म विभागाने हानीभरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण करण्याची चेतावणी ‘भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थे’ने दिली आहे.

(जनता आपल्या विविध मागण्यांसाठी प्रारंभी निवेदन देत असते, तर प्रसंगी आंदोलन करत असते. जनतेकडून सतत आंदोलने होत राहिल्यास प्रशासनाकडून ‘काम करतो’, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली जाते अन् नंतर आश्वासनाकडे दुर्लक्ष केले जाते. प्रशासनाच्या सातत्याच्या दुर्लक्षामुळे जनता टोकाची भूमिका घेण्याची चेतावणी देते अन् प्रशासनाला जाग येऊन कामे केली जातात, असे सध्या अनुभवायला मिळते ! प्रशासनात रूढ होत असलेली ही नवीन कार्यपद्धत सर्वथा अयोग्य आहे ? – संपादक)

याविषयी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. वर्ष २०१६ मध्ये खाण आस्थापनाने दायित्वशून्यतेने रेडी येथील नारळाच्या झाडांना (माडांना) पुरेसा पाणीपुरवठा न केल्यामुळे आणि खनिजयुक्त चिखलाचे पाणी माड बागायतीत सोडल्याने कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार अनुमाने १ सहस्र २८३ माडाची झाडे पाण्याअभावी सुकली आणि शेतकर्‍यांची ३८ लाख ४९ सहस्र रुपयांची हानी झाली.

२. शेतकर्‍यांच्या सहलीच्या नावाखाली रेडी ग्रामपंचायतीने केलेल्या शासकीय निधीचा गैरवापर, आरवली ग्रामपंचायतीच्या सीमेत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून बांधण्यात आलेल्या गणेश घाटच्या (श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे ठिकाण) कामाची चौकशी करावी अन् फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा.

३. कोरोना महामारीच्या काळात रेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा खनिकर्म निधीतून संमत केलेल्या नवीन रुग्णवाहिका या आरोग्य केंद्रास तात्काळ देण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.