‘महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती’चे अध्यक्ष अधिवक्ता प्रसाद करंदीकर यांचा आरोप
देवगड – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुण आणि व्यावसायिक यांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व वित्तीय संस्थांनी या सर्व परिस्थितीचा विचार करून गरजूंना विनासायास अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. यासाठी ‘पंतप्रधान मुद्रा अर्थसाहाय्य योजना’ शासनाने घोषित केलेली असतांनाही तिची कार्यवाही करण्यास जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत वित्तीय संस्थांना योजनेची जाणीव करून देण्यासाठी ‘पंतप्रधान मुद्रा अर्थसाहाय्य योजने’चे विज्ञापन असलेला फलक (बॅनर) वित्तीय संस्था आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्या कार्यालयांत भेट देण्याचे आंदोलन ‘महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती’च्या वतीने करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ १८ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजता देवगड येथून होणार आहे. कणकवली, ओरोस आणि कुडाळ येथेही हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती’चे अध्यक्ष अधिवक्ता प्रसाद करंदीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.