वडोदरा (गुजरात) येथील १०८ मंदिरांवरील ध्वनीक्षेपकांवरून भाविकांना ऐकवली जात आहे आरती आणि हनुमान चालिसा !

देशातील प्रत्येक शहरांत असा प्रयत्न करण्याची सामाजिक माध्यमांतून मागणी !

वडोदरा (गुजरात) – वडोदरा शहरातील १०८ मंदिरांमध्ये प्रतिदिन २ वेळा आरती आणि हनुमान चालिसा ध्वनीक्षेपकांवरून ऐकवली जात आहे. स्थानिक संघटना ‘मिशन राम सेतू’कडून हा प्रयत्न केला जात आहे. गेल्या वर्षीही या संघटनेने श्रावण मासामध्ये काही मंदिरांना ध्वनीक्षेपक वितरित केले होते. सामाजिक माध्यमांतून या प्रयत्नांचे समर्थन केले जात आहे. तसेच ‘देशातील सर्वच शहरांमध्ये असा प्रयत्न केला पाहिजे’, अशी मागणीही केली आहे.

ध्वनीक्षेपकांचे वितरण

शहरातील कालाघोडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारी ध्वनीक्षेपकांचे वितरण करण्यात आले. ध्वनीक्षेपक वाटपाच्या वेळी भाजपचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. याविषयी ‘मिशन राम सेतू’चे अध्यक्ष दीप अग्रवाल यांनी सांगितले की, भाविक घरामध्ये बसूनही आरती आणि हनुमान चालिसा ऐकू शकतात; म्हणून ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळातील नियमांमुळे लोकांना मंदिरात जाण्यास प्रतिबंध असल्याने लोकांना घरी राहून ध्वनीक्षेपकावरून आरतीचा लाभ घेता येऊ शकतो.