गोव्यात पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे अंश असल्याचा महत्त्वाच्या शहरांतील पाण्याच्या तपासणीवरून निष्कर्ष !

विज्ञानाने केलेल्या अनियंत्रित प्रगतीचा हा आहे दुष्परिणाम !

पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे कण

पणजी, ११ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे कणही दिसून येत असून ते आपल्या पोटात जाऊन नवीन विकारांना निमंत्रण देत आहेत. येथील समुद्र विज्ञान केंद्रात (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) महत्त्वाच्या शहरांतील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात आली होती. देहली येथील ‘टॉक्सिक्सलीक’ या संस्थेने राज्यातील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली असता नळाद्वारे पुरवठा केल्या जाणार्‍या पाण्यात प्लास्टिकचे अंश सापडले असून ते मानवी आरोग्याला अपायकारक आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. या संस्थेने मडगाव, पणजी, म्हापसा, माशेल आणि काणकोण येथे नळाद्वारे पुरवल्या जाणार्‍या पाण्याची तपासणी केली असता त्यात प्लास्टिकचे सूक्ष्म अंश असल्याचे आढळून आले. हे प्लास्टिकचे कण ५ मिलीमीटर आकाराचे असून समुद्री पर्यावरणामध्ये ते अत्यंत घातक प्रदूषण असल्याचा शोध यापूर्वीच आंतरराष्ट्रीय संस्थांनी लावला आहे. या प्रदूषणामुळे समुद्री सूक्ष्म जिवांवर परिणाम  होतोच, तसेच ते पिण्याच्या पाण्यातही मिसळते आणि मानवाच्या शरिरावर नियंत्रण मिळवते. हे प्रदूषण म्हापसा येथील नळाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात सापडले आहे. पाण्याच्या चाचणीमध्ये प्लास्टिकचे २६ वेगवेगळे घटक आढळून आले आहेत.

वैज्ञानिकाचा अभिप्राय

‘प्लास्टिकचे अशा पद्धतीचे कण नागरिकांना पुरवल्या जाणार्‍या पिण्याच्या पाण्यात आढळणे, ही अत्यंत धक्कादायक गोष्ट असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे सूक्ष्मकण सहज दृष्टीस पडत असून ते पाण्याद्वारे थेट शरिरात जातात. ही एक घातक रासायनिक प्रक्रिया असून ती प्राणघातक ठरू शकते.- प्रीती महेश, वैज्ञानिक, टॉक्सिक्सलीक संस्था.