पणजी, ११ ऑगस्ट (प्रसिद्धपत्रक) – ८ ऑगस्टला ‘एक देश, एक दंडसंहिता’, या रास्त मागणीसाठी, देहली येथे ‘भारत जोडो आंदोलन’ सहस्रो देशभक्तांच्या उत्साहजनक उपस्थितीत छेडणारे अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांना देहली पोलिसांनी केलेल्या अटकेचा ‘भारत माता की जय संघ, गोवा’ने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
याविषयी संघाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,
१. आंदोलनाबाहेरच्या घटकांकरवी मुसलमानविरोधी घोषणा पूर्वनियोजितरित्या घडवून आणून देशहिताचे आंदोलन उलटे आरोप करून चिरडून टाकण्याचा देहली शासनाचा हा निंद्य प्रयत्न आहे. या कपटी कारस्थानाचा आम्ही धिक्कार करत आहोत.
२. यापूर्वी देहलीत जनजीवन वेठीस धरून देशविरोधी घोषणा देणारे ‘शाहीनबाग’ येथील आंदोलक आणि शेतकरी आंदोलनाच्या नावाने लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वज ध्वजस्तंभावरून खेचून फाडून फेकून देणार्या आंदोलनाचे सगळे देशद्रोही चोचले पुरवणार्या देहली शासनाने अराजकीय व्यासपिठावरून ब्रिटीशकालिन कायद्यांच्या जागी स्वदेशी कायदे आणावेत, या देशहिताच्या मागणीसाठी छेडलेले आंदोलन चिरडण्याचे चालवलेले हे प्रयत्न निंदनीय आहेत.
३. देहलीतील जंतरमंतर मैदानात सभेसाठी अनुमती मागणारा अर्ज शेवटच्या क्षणी नाकारला गेला, सभास्थान आयत्या वेळी पालटायला भाग पाडून पूर्वस्थानी केलेले व्यासपीठ ध्वनीयंत्रणा, जलपुरवठा, आसनव्यवस्था आदी व्यवस्था विसकटून टाकल्या.
४. सभेला येणार्या राष्ट्रभक्तांना देहलीच्या सीमेवर अडवले, तसेच अल्प क्षमतेचा ध्वनीवर्धक वापरायचा निर्बंध घातला. अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांचे भाषण पूर्ण होण्याआधीच ध्वनीवर्धकाची ‘वायर’ कापून टाकली, ‘बॅरिकेड’ घालून लोकांना हाकलून सभेत येण्यापासून रोखले. या सगळ्या गोष्टी आम्ही प्रत्यक्ष अनुभवल्या.
५. देहली प्रशासनाने सभा होऊ न देण्याकरता केलेले सगळे प्रयत्न फसले. शेवटी नाटक घडवून आणून आंदोलन मुसलमानविरोधी बनवण्याचा बनाव केला.
६. देशहिताचे प्रयत्न पूर्ण शक्तीनिशी खच्ची करण्याच्या देहली शासनाच्या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.
७. राष्ट्रहितासाठी तळमळणारे अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांची त्वरित मुक्तता करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.