ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग
‘२६.६.२०२१ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या’ नृत्य विभागातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. शर्वरी कानस्कर (वय १४ वर्षे) आणि ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अंजली कानस्कर (वय २२ वर्षे) या बहिणींनी एका प्रसिद्ध मराठी चित्रपटातील महाराष्ट्रातील दोन सुप्रसिद्ध गायकांनी गायलेल्या लोकप्रिय गाण्यावर ‘जोगवा’ नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे त्यांनी ३०.६.२०२१ या दिवशी ‘आईचा जोगवा’ हे श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या आणि संत एकनाथ महाराजांनी रचलेल्या भक्तीगीतावर ‘जोगवा’ नृत्य सादर केले. दोन्ही प्रयोगांच्या वेळी कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर यांनी एकसारखीच वेशभूषा (नऊवारी साडी परिधान केली होती) आणि केशभूषा (अंबाडा) केली होती, तरीही मी दोन्ही नृत्य पहात असतांना दोन्ही नृत्यांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांमध्ये मला पुष्कळ भेद जाणवला. ‘मराठी चित्रपटातील गाण्यावर आणि सात्त्विक गाण्यावर केलेला ‘जोगवा’, या दोन्ही नृत्यांचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
१. जोगवा मागण्याच्या प्रथेची माहिती
‘जोगवा मागणे’ हा देवीच्या उपासनेतील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. ‘जोगवा मागणे’ म्हणजे ‘भिक्षा मागणे’ किंवा ‘कृपाप्रसाद मागणे’. या प्रथेमध्ये ‘यल्लमा, रेणुका, अंबा किंवा भवानी’ या देवींकडे जोगवा मागितला जातो. देवीचे दास म्हणून मुले किंवा मुली देवीला अर्पण केले जातात. मुलांना ‘जोगती’ आणि मुलींना ‘जोगतिणी’ म्हटले जाते. ‘जोगवा मागणे’ हे गायन, वादन आणि नृत्य महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेच्या अंतर्गत येते.’
(साभार : https://mr.wikipedia.org/wiki.)
२. एका प्रसिद्ध मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर केलेल्या ‘जोगवा’ नृत्याची सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक वैशिष्ट्ये
एका मराठी चित्रपटातील एक सुप्रसिद्ध गाणे महाराष्ट्रातील दोन सुप्रसिद्ध गायकांनी गायले आहे. या दोन्ही गायकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास असून त्यांच्यामध्ये त्रासदायक शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे त्यांनी गायलेल्या गीतातून तमोगुणाचे प्रक्षेपण होऊन वातावरण दूषित होते आणि गाणे ऐकणार्या श्रोत्यांवर त्रासदायक आवरण येते. त्यांच्या गाण्यामध्ये त्रासदायक शक्ती कार्यरत असल्यामुळे लोकांची मने त्यांच्या गायनाकडे आकृष्ट होतात आणि ती गाण्यात गुंतून त्यांच्यामध्ये वाईट शक्ती प्रकट होऊन त्या गाण्याच्या ठेक्यावर नाच करू लागतात. या गायकांनी गायलेल्या तामसिक गाण्यामुळे हे गाणे ऐकणार्या व्यक्तींमधील त्रासदायक वाईट शक्ती प्रकट होऊन नृत्य करतात. या गाण्यातील त्रासदायक शक्तीमुळे त्यांचे गाणे ऐकणारे आणि त्यावर नृत्य करणारे यांना मायावी सुखाची अनुभूती येते. अशा प्रकारे गायकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास असेल, तर त्यांच्या गायनामुळे त्यांची आणि त्यांचे गाणे ऐकणार्यांची आध्यात्मिक स्तरावर हानी होते. दोन्ही गायकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास असल्यामुळे त्यांच्या गायनातून देवीप्रतीचा भाव जागृत न होता गाण्यातील शब्द, ठेका आणि पार्श्वसंगीत यांच्याकडे लक्ष जाऊन मनाची वृत्ती बहिर्मुख होते. त्याचप्रमाणे या गाण्याचे पार्श्वसंगीतही पुष्कळ तमोगुणी आणि त्रासदायक आहे. ते ऐकत असतांना डोक्यावर घणाने घाव घातल्याप्रमाणे तमोगुणी त्रासदायक स्पंदनांचा सूक्ष्मातून आघात झाल्याप्रमाणे जाणवते. त्यामुळे या गाण्यात जरी देवीचे वर्णन केलेले असले, तरी गायकाला वाईट शक्तींचा त्रास असल्यामुळे आणि गाण्याचे पार्श्वसंगीत पुष्कळ तमोगुणी अन् त्रासदायक असल्यामुळे हे गाणे ऐकणार्यांच्या सूक्ष्म देहातील तमोगुण वाढून त्यांना वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो. या गाण्यावर सादर केलेल्या नृत्यातून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होते.
३. एका प्रसिद्ध मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर या बहिणींनी जोगवा नृत्य सादर करणे
कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर यांनी एका प्रसिद्ध मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर सात्त्विक पद्धतीने ‘जोगवा’ हे नृत्य सादर केले. त्यामुळे गाण्याची स्पंदने आणि नृत्याची स्पंदने एकमेकांशी जुळत नव्हती. नृत्य वायुतत्त्व, गायन सगुण स्तरावरील आकाशतत्त्व आणि वादन निर्गुण स्तरावरील आकाशतत्त्व यांच्याशी संबंधित असते. त्यामुळे तामसिक संगीत आणि गायन केलेल्या गाण्यावर कितीही सात्त्विक पद्धतीने नृत्य केले, तरी नृत्य करणारे अन् ते पहाणारे यांच्यावर त्रासदायक काळ्या शक्तीचे आवरण येते. तसेच कु. अंजली आणि कु. शर्वरी यांच्या संदर्भात घडले. त्यांनी या त्रासदायक तमोगुणी गाण्यावर जोगवा नृत्य केल्यामुळे त्यांच्यावर त्रासदायक शक्तीचे पुष्कळ आवरण आले. हे नृत्य पहात असतांना मला थोड्या वेळाने ‘जोगवा गाण्याचे पार्श्वसंगीत ऐकू नये’, असे वाटत होते; कारण यात मूळ गाण्याला पाश्चात्य संगीताप्रमाणे पार्श्वसंगीत दिले होते.
त्यामुळे या संगीताचा ठेका DJ (Disc Jockey प्रमाणे) त्रासदायक वाटत होता. तो ऐकत असतांना हृदयावर दाब येऊन हृदयाचे ठोके वाढत होते. त्याचप्रमाणे हे गायन आणि संगीत ऐकून मन अन् बुद्धी यांच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण वाढत होते. त्याचप्रमाणे ‘कु. अंजली आणि कु. शर्वरी यांच्यातील सात्त्विकता गाण्यातील तमोगुणी स्पंदनांशी लढण्यात व्यय होत आहे’, असे जाणवले. त्यामुळे ‘त्यांची प्राणशक्ती न्यून होऊन त्यांचा थकवा वाढत आहे’, असे जाणवले. त्यांच्या डोक्यावर त्रासदायक शक्तीचे दाट आवरण येऊन त्यांचे डोके जड होऊन त्यांच्या डोक्यावर दाब जाणवत होता. (प्रत्यक्षातही दोघींना हे नृत्य सादर करतांना त्यांच्या डोक्यावर पुष्कळ दाब जाणवत होता आणि त्यांना आध्यात्मिक त्रास होत होता. हे नृत्य केल्यानंतर त्यांना पुष्कळ थकवा आला. – संकलक)
४. अशास्त्रीय आणि रज-तम प्रधान नृत्य सादर केल्यामुळे सूक्ष्म स्तरावर होणारा परिणाम
वरील उदाहरणातून हे लक्षात येते की, नर्तक जरी सात्त्विक, पारंपारिक आणि शास्त्रीय नृत्यकला शिकलेला असला अन् त्याने जरी सात्त्विक पोषाख परिधान केला असला, तरी त्याला जर वाईट शक्तींचा त्रास असेल आणि त्याला साधनेविषयी माहिती नसेल, तर त्याच्याकडून नृत्यकला विकृत स्वरूपात सादर होते. यावरून कलाकाराला त्याची कला सात्त्विक स्वरूपात भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन घेऊन साधना करणे नितांत आवश्यक आहे. अन्यथा मोहमाया आणि अज्ञान यांच्या प्रभावामुळे प्रतिभावंत कलाकारही वाईट शक्तींच्या आधीन रहातो. त्यामुळे मूळ लोकनृत्य किंवा भारतीय शास्त्रीय नृत्य सादर न करता त्यामध्ये स्वतःच्या मनानुसार पालट करून चित्रविचित्र हावभाव आणि तामसिक किंवा अतिशय जलद हालचाली करून केलेल्या नृत्यातून त्रासदायक स्पंदनेच वातावरणात प्रक्षेपित होतात. अशा प्रकारचे नृत्य करण्यासाठी विविध वाहिन्यांवर विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच कलाक्षेत्रातील दिग्गजांना अशा कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून नियुक्त केले जाते. यांपैकी अनेक परीक्षक सात्त्विक नसल्यामुळे ते शास्त्रीय नृत्य, गायन किंवा वादन या कलांमध्ये मनानुसार पालट करून नाविन्यपूर्ण नृत्य, गायन किंवा वादन (fusion dance & music) या कला सादर करणार्या कलाकारांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे विकृत आणि तामसिक कलेचा प्रसार समाजात होऊन कलाकारांची व्यष्टी स्तरावर आणि समाजाची समष्टी स्तरावर पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक हानी होते.
५. संत एकनाथ महाराजांनी रचलेले ‘आईचा जोगवा’ हे भक्तीगीत आणि श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या गाण्यावर कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर यांनी ‘जोगवा’ नृत्य सादर करणे
‘आईचा जोगवा जोगवा मागीन’, या संत एकनाथ महाराजांनी रचलेल्या भक्तीगीतावर श्रीमती अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या गाण्यावर कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर यांनी ‘जोगवा’ हे नृत्य केले. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या या भक्तीगीतामध्ये मुळातच पुष्कळ चैतन्य आहे. तसेच श्रीमती अनुराधा पौडवाल यांनीही हे भक्तीगीत सात्त्विक पद्धतीने गायले आहे. त्यामुळे या भक्तीगीताचे गायन ऐकतांना पुष्कळ सात्त्विकता जाणवते. या गायनाला ‘संबळ, मृदंग, तबला, एकतारी आणि झांज’, या पारंपरिक वाद्यांचे पार्श्वसंगीत दिले आहे. त्यामुळे हे गायन आणि वादन ऐकत असतांना सात्त्विकता जाणवून देवीप्रतीचा भाव काही प्रमाणात जागृत झाला. कु. शर्वरी आणि कु. अंजली यांनी भावपूर्णरित्या नृत्य सादर केले. त्यांनी नृत्याच्या वेळी केलेल्या देवीच्या भावमुद्रा पहात असतांना माझा भाव जागृत होत होता आणि नृत्याच्या ठिकाणी श्री भवानीदेवीचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत होते.
६. ‘जोगवा’ या नृत्याच्या प्रयोगाच्या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष
अ. भारतातील पारंपरिक लोकनृत्यांपैकी काही लोकनृत्य सात्त्विक, काही राजसिक आणि काही तामसिक स्वरूपाची आहेत.
आ. आधुनिक पद्धतीने केलेले लोकनृत्य पुष्कळ रज-तमात्मक आहे, उदा. ‘जोगवा फ्युजन’, डिस्को दांडिया इत्यादी.
इ. लोकनृत्यांकडे केवळ मनोरंजन म्हणून न पहाता ‘नृत्य करून देवाला अनुभवता येते का ?’, हा प्रयत्न केला, तर ज्या नृत्य कलेतून ईश्वराची आराधना होईल, ती नृत्यकला ईश्वराच्या चरणी समर्पित होईल.
ई. भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीत या कला जशा सात्त्विक आहेत, तशा काही लोकनृत्यकलाही सात्त्विक आहेत, उदा. पारंपरिक गरबा, पारंपरिक जोगवा, पारंपरिक गोटिपुआ नृत्य इत्यादी.
उ. केवळ लोकनृत्य किंवा वेशभूषा किंवा केशभूषा सात्त्विक असून उपयोग नाही, तर नृत्य ज्या गीतावर केले जाते, ते गीत आणि पार्श्वसंगीत हे दोन्ही तितकेच सात्त्विक असणे आवश्यक आहे.
ऊ. नर्तक, गायक आणि वादक यांना वाईट शक्तींचा त्रास असेल, तर त्यांच्याकडून शास्त्रीय नृत्य, गायन किंवा वादन या कला विकृत स्वरूपात सादर केल्या जातात. त्यामुळे या कला सादर करणारे आणि या कलांचा आस्वाद घेणारे रसिक यांच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येऊन त्यांची वृत्ती बहिर्मुख होते अन् त्यांना तामसिक सुख मिळते. त्यामुळे कलाकारांनी आध्यात्मिक उपाय आणि योग्य साधना केली, तरच त्यांना होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून होऊन त्यांच्यातील रज-तम यांचे प्रमाण न्यून होऊन त्यांच्याकडून सात्त्विक कला सादर केली जाऊ शकते. यावरून आपल्याला आध्यात्मिक उपाय आणि योग्य साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते.
ए. नर्तक, गायक आणि वादक यांना वाईट शक्तींचा त्रास नसेल, तर त्यांच्याकडून शास्त्रीय नृत्य, गायन किंवा वादन या कला मूळ अन् सात्त्विक स्वरूपात सादर केल्या जातात. त्यामुळे या कला सादर करणारे आणि या कलांचा आस्वाद घेणारे रसिक यांच्यावर कलेचा सकारात्मक परिणाम होऊन त्यांची ‘वृत्ती अंतर्मुख होऊन त्यांना चांगली शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती जाणवणे’, यांसारख्या अनुभूती येतात.
ऐ. केवळ मनोरंजनासाठी नृत्य केले, तर त्यातून राजसिक किंवा तामसिक स्वरूपाची स्पंदने येतात; परंतु जर ईश्वरप्राप्तीसाठी नृत्य केले, तर त्यातून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.
ओ. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीत यांच्यासह सात्त्विक लोकनृत्यही जोपासले पाहिजे.
औ. भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीत यांच्यासह सात्त्विक लोकनृत्य करतांना कलाकारांनी धर्माचरण आणि साधना केल्यास त्यांच्यामध्ये सात्त्विक शक्ती कार्यरत होऊन त्यांच्या कलेतून सात्त्विक स्पंदने वातावरणात पसरतील. कलाकाराने साधना केल्यामुळेच त्याची कला ईश्वराच्या चरणी समर्पित होऊन त्याला कलेतून ईश्वरप्राप्ती करता येते.
अं. कलाकाराने सात्त्विक कला आत्मसात केल्याने त्याची व्यष्टी साधना आणि त्याने सात्त्विक कलेचे प्रदर्शन केल्याने त्याची समष्टी साधना होते. व्यष्टी आणि समष्टी स्तरावरील साधना होण्यासाठी त्याने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कला अन् साधना शिकायला हवी. यावरून सात्त्विक कलेची जोपासना करणार्या ‘गुरु-शिष्य’ परंपरेचे महत्त्व आपल्या लक्षात येते.
क. कलाकाराने प्रसिद्धी, पैसा, मान-सन्मान आणि पद मिळण्यासाठी म्हणजे सकाम इच्छा बाळगून कला सादर केली, तर त्याची साधना होत नाही. या उलट जर कलाकाराने ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी म्हणजे निष्काम भावाने कला सादर केली, तर त्या कलेच्या माध्यमातून कलाकाराची साधना चांगल्या प्रकारे होते आणि समाजावर सात्त्विक कलेचा संस्कार होतो. समष्टी पद्धतीने कला सादर केल्याने कलाकाराला व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर लाभ होतो.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०२१)
|