नास्तिकतावाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी अनुमती द्यावी !

भाजपचे वरळी विधानसभा कार्यक्षेत्राचे सचिव संगठन शर्मा यांचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर आणि भाजपचे गटनेते यांना निवेदनाद्वारे आवाहन

धर्मरक्षणासाठी पुढाकार घेणारे भाजपचे श्री. संगठन शर्मा यांचे अभिनंदन ! हिंदु धर्मशास्त्रानुसार सण-उत्सव साजरे करण्याची तळमळ किती हिंदुत्वनिष्ठ नेत्यांमध्ये आहे ?

(डावीकडून) धर्मप्रेमी श्री. मनीष तिवारी, श्री. संगठन शर्मा, दक्षिण मुंबईतील भाजपचे नेते श्री. विनय त्रिपाठी, भाजपचे मुंबई पक्षनेते विनोद मिश्रा यांच्याकडून निवेदन स्वीकारतांना भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (सर्वांत उजवीकडे)

मुंबई, ११ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदूंचे उत्सव हे पर्यावरणपूरक आहेत. ‘श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे’, असे ‘पूजासमुच्चय’ या ग्रंथात म्हटले आहे. असे शास्त्र असतांना मुंबईत गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्याऐवजी कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन करण्यात येते. नास्तिकतावाद्यांच्या अशा प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी महानगरपालिकेने अनुमती द्यावी, असे आवाहन भाजपचे वरळी विधानसभा क्षेत्राचे सचिव श्री. संगठन शर्मा यांनी केले आहे. शर्मा यांनी या मागणीचे निवेदन मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर, तसेच आयुक्त आणि भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांना ९ ऑगस्ट या दिवशी दिले.

या निवेदनात श्री. शर्मा यांनी म्हटले आहे…

१. मुंबई शहरातील सांडपाणी गटार आणि नाले यांद्वारे समुद्रात मिसळते. याविषयी अनेक वेळा वृत्तपत्रांतून आवाज उठवण्यात आला आहे. शहरातील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी, तसेच मांसविक्री करणार्‍या दुकानांतून बाहेर पडणारे रक्तमिश्रित सांडपाणी समुद्रात मिसळते. न्यायालयाचा आदेश असूनही हे प्रकार चालू आहेत. या विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही.

२. मुंबईत सहस्रावधी लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना समुद्रात सोडले जात आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न न करता श्री गणेशमूर्ती समुद्रात विसर्जित करण्याला विरोध करणे अनाकलनीय आहे.

३. मूर्तीदान, तसेच कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यास सांगून पुढे त्या मूर्ती कचरा म्हणून टाकून दिल्या जातात आणि गणेशभक्तांचा विश्‍वासघात केला जातो. मूर्तीची अशा प्रकारे विटंबना करणार्‍यांवर गुन्हे नोंद करण्यात यावेत.

४. कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती अनेकदा प्रशासनाच्या कचर्‍याच्या गाड्यांमधून निर्जनस्थळी टाकल्या जातात. त्यामुळे हे अशास्त्रीय आणि भाविकांच्या श्रद्धेचे भंजन करणारे खर्चिक प्रकार न करता प्रशासनाने भाविकांना श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्यासाठी सहकार्य करावे.