भाजपचे नेते दत्ता सामंत यांचा पुढाकार
मालवण – तालुक्यातील तारकर्ली येथील ज्येष्ठ गणेशमूर्तीकार आप्पाजी श्रीधर तारी यांच्या गणेशमूर्ती शाळेची नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीमुळे हानी झाली होती. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्ती ठेवण्याविषयी तारी यांना समस्या निर्माण झाली होती. भाजपचे नेते दत्ता सामंत यांच्या पुढाकाराने तारी यांची ही समस्या सुटली असून त्यांना गावातीलच शासकीय मत्स्यव्यवसाय विभागाच्या शाळेत श्री गणेशाच्या मूर्ती ठेवण्यास प्रशासनाकडून अनुमती मिळाली आहे.
तारकर्ली येथे तारी यांची ‘भवानी कला केंद्र’ नावाने गणेशमूर्ती शाळा आहे. नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीत भवानी कला केंद्राची एक भिंत पडली, तर इमारतीचे छप्पर जीर्ण झाले आहे. श्री गणेशचतुर्थी सण जवळ आला आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्ती बनवण्यात येत आहे. या श्री गणेशमूर्ती ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. तसेच छप्पर कोसळले, तर या मूर्तींची हानीही होण्याची भीती होती. भवानी कला केंद्राजवळ शासकीय मत्स्य व्यवसाय विभागाची शाळा आहे आणि सध्या कोरोनामुळे ती बंद आहे. त्यामुळे गणेशचतुर्थी सण साजरा होईपर्यंत ही इमारत श्री गणेशमूर्ती ठेवण्यासाठी भाड्याने मिळावी, अशी मागणी आप्पाजी तारी यांनी केली होती. या समस्येकडे भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांचे लक्ष वेधले. त्यानंतर तारी यांना श्री गणेशाच्या मूर्ती ठेवण्यासाठी तारकर्ली येथील शाळेची इमारत उपलब्ध करून देण्याच्या सूचना सौ. सावंत यांनी दिल्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना याविषयीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तारी यांची श्री गणेशमूर्ती ठेवण्याची समस्या मिटली आहे.