सावंतवाडी – येथील तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे रत्नागिरी येथे स्थानांतर करण्यात आले आहे. तहसीलदार म्हात्रे यांनी त्यांच्या सेवाकाळात समाजाभिमुख काम केले. कोरोनाच्या काळातही जनतेला आधार वाटेल, असे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या स्थानांतराला विरोध वाढत आहे. तालुक्यातील सरपंच संघटनेनेही म्हात्रे यांच्या स्थानांतराला विरोध करत ९ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ‘येत्या दोन दिवसांत म्हात्रे यांचे स्थानांतर रहित न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली. तहसीलदार म्हात्रे यांच्या स्थानांतरास तालुक्यातून विविध स्तरांतून विरोध होत आहे.
(सध्या काही अपवाद वगळता सर्वसामान्य जनतेला प्रशासनाचा वाईटच अनुभव येतो. त्यामुळे एखादा जनताभिमुख अधिकारी आपल्या क्षेत्रात आला, तर जनता त्याच्या स्थानांतरास विरोध करते. ही स्थिती पालटायची असेल, तर ‘सरकारी काम आणि ६ मास थांब’, ही प्रशासनाच्या संदर्भात प्रचलित झालेली अन् वस्तूस्थिती सांगणारी म्हण खोटी ठरवण्यासाठी प्रशासनाला काम करावे लागेल. तरच जनतेच्या मनात विश्वास निर्माण होऊन अधिकार्यांच्या स्थानांतरास विरोध करणार नाही ! – संपादक)