सध्याच्या स्थितीत ‘कोणतेही संकट किंवा एखादा बिकट प्रसंग असो, त्यातून मोकळे होण्यासाठी ‘आत्महत्या करणे’ हा साधासोपा मार्ग आहे’, असे अनेकांना वाटते. तरुण, शेतकरी, महिला, व्यावसायिक, अभिनेते, अभिनेत्री, इतकेच काय, तर पोलीस आणि सैनिक अशा सर्वच क्षेत्रांतील लोक आत्महत्या करून जीवन एका क्षणात संपवून टाकतात. ‘आत्महत्येमुळे आज मरण पुष्कळ स्वस्त झाले आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. वर्ष २०१५ ते २०२० या काळात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सी.ए.पी.एफ्.च्या) ६८० सैनिकांनी आत्महत्या केली होती, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नुकतीच राज्यसभेत दिली. त्या सैनिकांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सी.आर्.पी.एफ्.) आणि सीमा सुरक्षा दल (बी.एस्.एफ्.) यांच्या सैनिकांचाही समावेश आहे. आत्महत्येमागील प्रमुख कारण कौटुंबिक असून आर्थिक विवंचना आणि आजारपण यांना कंटाळूनही काही सैनिकांनी आत्महत्या केली होती. केवळ ५ वर्षांत ६८० सैनिकांची आत्महत्या, हे वाचून कुणाच्याही अंगावर काटा येईल. जो सैनिक देश आणि देशातील नागरिक यांच्या रक्षणार्थ भारतमातेच्या भूमीवर सदैव कार्यरत राहून चोख कर्तव्य बजावत असतो, तो सैनिक आत्महत्या करू शकेल, यावर खरेतर कुणाचाही विश्वास बसणार नाही; पण सत्य स्वीकारायलाच हवे. ६८० ही संख्या किरकोळ नक्कीच नाही. सैनिकांची आत्महत्या ही देशासाठी लज्जास्पद आणि देशाला कलंकच ठरते. आत्महत्येतून नव्हे, तर सैनिकांच्या बलीदानातून राष्ट्रोत्कर्ष साधला जात असतो. हे लक्षात घेतले, तर आत्महत्या करणे, ही देशावर ओढावलेली नामुष्कीच म्हणावी लागेल.
आत्महत्यांमुळे देशाची हानी !
समाजात अन्य कुणाच्या आत्महत्या, त्यासाठी कारणीभूत ठरणारी त्यांची दुर्बल मनोवृत्ती, आयुष्यातील अनंत अडचणी, त्यातून येणारी हतबलता हे सर्व समजू शकते; पण ‘सैनिकाची आत्महत्या’ ही गोष्ट विचार करायला नक्कीच प्रवृत्त करते. सैनिक म्हटले की, ‘कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता तिच्याशी २ हात करणारा, कणखर मनोवृत्तीचा’ असे चित्र आपल्यासमोर उभे रहाते. देशाभिमान आणि भारतमातेवरील प्रेम यांमुळेच तो आपले संपूर्ण आयुष्य देशरक्षणात देण्यासाठी पूर्णतः सिद्ध झालेला असतो. सैन्यदलात भरती होण्यापूर्वी त्याला कठोर असे शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणही घ्यावे लागते. त्यातून तो तावून सुलाखून बाहेर पडून, सगळे कष्ट सोसून कोणताही आघात झेलण्यासाठी ‘सैनिक’ या पदावर रुजू होतो. हा क्षण त्याच्या आयुष्यातील निश्चितच संस्मरणीय क्षण असतो. कठोर परिश्रम घेऊन सिद्ध झालेला सैनिक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला कसा सिद्ध होतो ? याचा सैन्यदल आणि पर्यायाने सरकार यांनी विचार करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा आत्महत्या करणार्या सैनिकांची संख्या आणखी वाढण्यास वेळ लागणार नाही. तसे झाले, तर ते देशाच्या संरक्षण विभागाचे मोठे अपयशच ठरेल ! एकेक सैनिक अशा प्रकारे गमावणे म्हणजे देशाची प्रत्येक टप्प्यावर होणारी अनेक पटींची हानीच आहे.
हेही दिवस जातील !
सैनिकांच्या आत्महत्येला त्यांच्यात मनोधैर्य नसणे हेही कारण ठरत आहे; पण हे मनोधैर्य निर्माण का होत नाही ? सद्य:स्थितीत अनेक जण ‘पाप-पुण्य’ ही संकल्पनाच मानत नसतात. त्यामुळे चांगले-वाईट, सुख-दुःख यातून कुणीही अपेक्षितदृष्ट्या शिकत नाही. प्रतिकूल स्थिती उद्भवली किंवा कौटुंबिक अडचण आली की, दुःख कवटाळून आत्महत्येच्या चुकीच्या दिशेने हे सैनिक वहावत जातात. सैनिकांच्या आत्महत्यांचा अभ्यास करता, त्यांना देण्यात येणार्या प्रशिक्षणाचाही सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण देतांना सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात; मात्र ते पुरेसे आहेत का ? सीमेवर किंवा बाह्य शत्रूशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण सैनिकांना दिले जाते; मात्र स्वतःमधील नकारात्मकता, औदासिन्य आदी अंतर्गत दोषांवर मात करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते का ?
आजच्या तांत्रिक आणि आभासी युगामध्ये समस्यांचा सामना करता करता मनुष्य एकाकी पडत आहे. ‘आत्महत्या करणारे बहुतेक जण हे एकाकी असतात. एकाकीपणाचा हानीकारक परिणाम मेंदूच्या पेशींवर होतो. हा एकाकीपणा मेंदूच्या कार्यक्षमतेवरही वेगाने प्रभाव टाकतो’, हा संशोधनातून काढलेला निष्कर्ष आहे. स्पर्श, आवाज किंवा व्यक्ती हे सर्व असले की, एकाकीपणा जाऊन सुरक्षित वाटू लागते. पूर्वीच्या काळची एकत्र कुटुंबपद्धत पाहिली, तर तेव्हा आत्महत्यांचे प्रमाण अल्प होते. आज बोलण्यासाठी कुणाकडेही वेळ नसतो. याला भारतियांनी अंगीकारलेली पाश्चात्त्य संस्कृती, तिचे अंधानुकरण, भारतीय संस्कृती आणि मूल्ये यांचा होणारा र्हास हे सर्व घटक कारणीभूत आहेत. आत्महत्येचा निर्णय घेणार्या प्रत्येकाने आततायीपणा करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. आयुष्यात येणारी प्रत्येक घटना ‘संधी’ म्हणून स्वीकारली, तरच त्यावर मात करून मार्गक्रमण करता येते; मात्र त्यासाठी मनाचा ठाम निर्धार आवश्यक असतो. तो निर्धार नैतिक मूल्यांचा अंगीकार, तसेच धर्म आणि संस्कृती यांचे पालन करणे यांतूनच मिळू शकतो. भगवान श्रीकृष्णाचे आयुष्यही संघर्षमयच होते. अवतारांच्या, संतांच्या किंवा राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातून त्यांनी संघर्ष कसा केला, हे शिकता येईल. त्यांचा आदर्श आपण समोर ठेवायला हवा. ‘हेही दिवस जातील’, असे म्हणत प्रतिकूलतेचा सामना करायला शिकले पाहिजे. ‘आत्महत्या’ हे कोणत्याही समस्येवरील उत्तर नाही, हे सैनिकांनी जाणावे ! सध्या सीमेवर युद्धजन्य स्थिती आहे. अशा वेळी सैनिक मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे आणि एकही सैनिक आत्महत्या करणार नाही, अशी स्थिती निर्माण करावी, ही अपेक्षा !