कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्टला सावंतवाडी रेल्वेस्थानकाबाहेर लाक्षणिक उपोषण करण्याची प्रवासी संघटनेची चेतावणी

कोकण रेल्वे

सावंतवाडी – कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांविषयी रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी १५ ऑगस्ट या दिवशी मळगाव (तालुका सावंतवाडी) येथील रेल्वेस्थानकासमोर १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याची चेतावणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी.के. सावंत यांनी दिली आहे.

याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सावंत यांनी म्हटले आहे की, कोकण रेल्वे चालू होऊन जवळजवळ २५ वर्षे झाली; परंतु कोकण रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांच्या रास्त मागण्या मान्य झालेल्या नाहीत. यासाठी गेली अनेक वर्षे अर्ज, विनंत्या, उपोषणे आदी वैध मार्गांचा अवलंब केला; मात्र याकडे प्रशासनाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुणे येथे कोकणातील अनुमाने १० लाख कुटुंबे उदरनिर्वाहासाठी पिढ्यान्पिढ्या स्थायिक असून सणावाराला, कौटुंबिक बर्‍यावाईट प्रसंगी, जत्रा, महोत्सव, धार्मिक विधी यांसाठी आपल्या मायभूमीत वारंवार येत असतात.

गेली अनेक वर्षे वारंवार मागण्या करूनही कोकण रेल्वेमार्गावर काही ठिकाणी गाड्यांना थांबे मिळत नाहीत. कोकणी माणसाला गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे याविषयी योग्य तो निर्णय घेण्यात यावा. कोकण हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असून सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा  निसर्गरम्य कोकणात मोठ्या प्रमाणात येऊ इच्छिणार्‍या देश-विदेशातील पर्यटकांची फारच गैरसोय होत आहे. ‘कारवार-मडगाव पॅसेंजर’ गाड्या सावंतवाडी आणि कुडाळ या स्थानकांपर्यंत सोडाव्यात, यासह अनेक मागण्यांसाठी कोरोनाचे नियम पाळून १५ ऑगस्टला उपोषण करण्यात येणार आहे.