राज्यातील १ लक्ष नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेतलेली नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, ५ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील सुमारे १ लक्ष नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेतलेली नाही. कोरोना लसीकरण मोहीम आम्ही मतदार सूचीनुसार राबवली. यातील अनेक नागरिक गोव्यात वास्तव्यास नसल्याचे, तर अनेक नागरिक विदेशात असल्याचे लक्षात आले आहे. या नागरिकांविषयी अधिक माहिती गोळा करण्याचा आदेश संबंधित खात्याला दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक ! – आरोग्य विषयक तज्ञ

पणजी – कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनीही कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक सावधगिरी बाळगली पाहिजे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनीही नेहमी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन करावे, अशी चेतावणी राज्यातील आरोग्यविषयक तज्ञांनी कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आल्याच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. राज्यात संचारबंदीमध्ये विविध शिथिलता आणली जात असतांना, तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतांना आरोग्यविषयक तज्ञांनी ही चेतावणी दिली आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील ‘कम्युनिटी मेडिसीन’ विभागाचे प्रमुख प्रा. (डॉ.) जगदीश काकोडकर म्हणाले, ‘‘कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांना जर कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येतील आणि त्यांच्यापासून इतरांना (विशेषत: मुलांना ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आलेली नाही) कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. आतापर्यंत ८८.२ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा घेतली आहे, तर केवळ २३.५ टक्के नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. प्रत्येक नागरिकाने लसीच्या दोन्ही मात्रा लवकरात लवकर घ्याव्या, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आगामी गणेशोत्सव, तसेच इतर सण साजरे करतांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत. गोव्याच्या शेजारील कर्नाटक आणि केरळ या राज्यांत सण साजरा करतांना आवश्यक सावधगिरी न बाळगल्याने तेथे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. ’’ राज्यातील लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर म्हणाले, ‘‘कोरोनाच्या नवीन प्रकारावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा कितपत प्रभाव पडतो, याची स्पष्ट माहिती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे लस घेतली असली, तरी आवश्यक सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.’’