भारत वर्ष २०३० पर्यंत प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करील ! – अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा

माजी राजदूत रिचर्ड वर्मा

नवी देहली – वर्ष २०३० कडे पहातांना मला जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकेल असा भारत दिसतो, असे विधान अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत रिचर्ड वर्मा यांनी केले. ‘जगातील २ सर्वांत मोठ्या लोकशाही (भारत आणि अमेरिका) एकत्र आल्यास पुष्कळ काही करू शकतात’, असेही ते म्हणाले. ते ‘जिंदाल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्स’ने आयोजित केेलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
रिचर्ड वर्मा यांनी सांगितले की, भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असून सर्वाधिक महाविद्यालयीन पदवीधर, सर्वांत मोठा मध्यम वर्ग, सर्वाधिक भ्रमणभाष आणि इंटरनेट वापरकर्ते भारतात वास्तव्य करतात. जगात सर्वांत मोठे सैन्यबळ असलेल्या सूचीत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या भारतात २५ वर्षांपेक्षा अल्प वय असणारे ६० कोटी लोक आहेत. आशियातील सर्वांत तरुण कर्मचारी भारतामध्ये आहेत. वर्ष २०५० पर्यंत भारताला त्याचा लाभ होत राहील.