सिंधुदुग (जि.मा.का.) – दोडामार्ग तालुक्यातील मौजे कळणे येथील खाणपट्ट्यात २९ जुलै या दिवशी दुर्घटना झाली. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियन २००५ नुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तेथील खनिज उत्खनन आणि त्याची वाहतूक पुढील आदेश मिळेपर्यंत तात्काळ बंद करावी, तसेच खाण सुरक्षा निर्देशालय, प्रादेशिक कार्यालय, गोवा यांच्या निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना हाती घ्याव्यात, असा आदेश मेसर्स मिनरल्स अँड मेटल्स या आस्थापनाला २ ऑगस्ट या दिवशी दिला.
मे. मिनरल्स अँड मेटल्स या आस्थापनाचे संचालक संदीप श्रीवास्तव आणि कळणे माईनचे व्यवस्थापक यांना दिलेल्या या आदेशात म्हटले आहे की, २९ जुलै या दिवशी कळणे येथील प्रमुख खाणीत भरलेल्या पाण्यात डोंगराचा काही भाग कोसळून ते पाणी मोठ्या प्रमाणात येथील २० ते २५ कुटुंबांच्या घरामध्ये गेले, तसेच शेती आणि बागायती यांचीही हानी झाली आहे.