सावंतवाडी तालुक्यात अतीवृष्टीमुळे ८० कोटी रुपयांची हानी

अतीवृष्टीमुळे ८० कोटी रुपयांची हानी (प्रातिनिधिक चित्र)

सावंतवाडी, २ ऑगस्ट (वार्ता.) – अतीवृष्टी आणि महापूर यांमुळे झालेल्या हानीचे ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. यानुसार तालुक्यात अतीवृष्टी आणि महापूर यांमुळे आतापर्यंत विविध प्रकारची ८० कोटी रुपयांची हानी झाली आहे, अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.

२३ जुलै या दिवशी झालेल्या अतीवृष्टीमुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे सावंतवाडी तालुक्यात बांदा, शेर्ले, इन्सुली, वाफोली, विलवडे आणि माडखोल या गावांत सर्वाधिक हानी झाली आहे. तालुक्यात झालेल्या हानीपैकी ४० कोटी रुपयांची हानी बांदा शहरात झाली आहे. तालुक्यातून वहाणार्‍या तेरेखोल नदीतील गाळ काढण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला असून संबंधित असलेल्या ग्रामपंचायतींना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांकडून तसे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या हानीच्या भरपाईसाठी ५ कोटी ३४ लाख रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम संबंधित आपद्ग्रस्तांच्या खात्यात जमा होणार आहे. पाऊस आणि पूर यांमुळे हानी झालेल्यांना अधिकाधिक भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.