पाकचे पंतप्रधान इम्रान खान विश्‍वासघातकी असून त्यांच्यावर बंदी घाला ! – कॅनडाचे माजी मंत्री ख्रिस अ‍ॅलेक्झँडर यांची मागणी

पाककडून अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यात येत असल्याचे प्रकरण

ख्रिस अ‍ॅलेक्झँडर

काबुल (अफगाणिस्तान) – इम्रान खान ही व्यक्ती विश्‍वासघातकी आणि खोटारडी आहे. या व्यक्तीमध्ये कोणतीही क्षमता नाही. ही व्यक्ती कपटी आहे. मागील काही दशकांपासून तालिबानला जे काही मूर्ख लोक साहाय्य करत आहेत, त्यांतील इम्रान खान हे एक आहेत, अशी कठोर टीका कॅनडाचे माजी मंत्री आणि अफगाणिस्तानमधील कॅनडाचे माजी राजदूत ख्रिस अ‍ॅलेक्झँडर यांनी केली आहे. ख्रिस यांनी ‘तालिबानला प्रोत्साहित केल्यावरून इम्रान खान यांच्यावर बंदी घातली पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली.

ख्रिस अ‍ॅलेक्झँडर यांच्या विधानावर पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने टीका केली आहे. ख्रिस यांचे आरोप निराधार असून पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थिरता यांसाठी काम करत आहे, असा दावा केला आहे. (पाक आणि शांतता, असे कधीतरी होऊ शकेल का ? पाक तालिबानला साहाय्य करत आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे त्याने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी तो निष्फळच आहे ! – संपादक)