महापुराच्या काळात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून पूरग्रस्तांना साहाय्य !

मिरज (सांगली जिल्हा) येथे पूरग्रस्तांची सुटका करणार्‍या पथकातील तरुणांना भोजन आणि पाणी देतांना श्रेयस गाडगीळ, तसेच अन्य सहकारी

सांगली – महापुराच्या काळात सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांच्याकडून पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात आले. पूरग्रस्तांना पाण्यातून बाहेर काढणे, सुरक्षित ठिकाणी नेणे, त्यांना भोजन-पाणी देणे, त्यांच्या निवार्‍याची सोय करणे, त्यांना औषधोपचार देणे यांसह अनेक गोष्टी यातील कार्यकर्त्यांनी सेवाभावी वृत्तीने केल्या.

मिरज (सांगली जिल्हा) येथे पूरग्रस्तांसाठी भोजन सिद्ध करणारे कार्यकर्ते

१. सांगली-मिरज शहरात माजी दिवंगत आमदार संभाजी पवार यांच्या स्मरणार्थ युवा नेते पृथ्वीराज पवार, गौतम पवार, माधवराव गाडगीळ मित्र परिवार, श्री विघ्नराज सार्वजनिक उत्सव मंडळ, पाटील हौद, श्रीमंत केशव गणेशोत्सव मंडळ, खाडिलकर गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज आणि सांगली येथील पूरग्रस्त नागरिक अन् पूरग्रस्तांची सुटका करणार्‍या पथकातील तरुण यांना भोजन आणि पाणी यांचे वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात पृथ्वीराज पवार, गौतम पवार, श्रेयस गाडगीळ, अभिजित गद्रे , शुभम् गुरव, मयुरेश कवठेकर सहभागी झाले होते.

२. शिवसेना मिरज तालुकाप्रमुख विशालसिंग राजपूत यांच्या वतीने मिरज तालुक्यातील वड्डी आणि ढवळी येथील पूरग्रस्तांना २०० किलो तांदूळ आणि १०० कपड्यांचे जोड देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे कुबेरसिंग राजपूत, बबन कोळी, ढवळीचे सरपंच आर्.आर्. आबा, सदानंद कुंडेकर यांसह अन्य उपस्थित होते.

ढवळी (सांगली जिल्हा) येथील पूरग्रस्तांना साहाय्य देतांना शिवसेना मिरज तालुकाप्रमुख विशालसिंग राजपूत, कुबेर राजपूत, तसेच अन्य

कोल्हापूर जिल्हा

पूरग्रस्तांना पुराच्या पाण्यातून साहाय्य घेऊन जातांना छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानचे (कोल्हापूर जिल्हा) कायकर्ते

१. छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान आणि देणगीदार यांच्याकडून एन्.एच्. ४ राष्ट्रीय महामार्ग आणि इंगळी गावातील पूरग्रस्तांना भोजनाचे साहाय्य करण्यात आले.

पूरग्रस्तांना देण्यात येणार्‍या भोजनाच्या पाकिटांसह छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानचे (कोल्हापूर जिल्हा) कायकर्ते

२. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित तालुक्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे साहाय्य केंद्र टिंबर मार्केट येथील पाटीदार भवन येथे चालू करण्यात आले आहे. समितीच्या वतीने पूरग्रस्त ठिकाणी स्वच्छता, औषध फवारणी, स्थलांतरित नागरिकांची आरोग्य पडताळणी, औषध पुरवठा, नागरिकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. त्यासाठी गरजूंनी राहुल पाटगावकर – ९२२५८०५४७४, अतुल कुलकर्णी – ९५४५४५०५२५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकाचे भाजप नगरसेवक युवराज बावडेकर यांनी पुराच्या पाण्यात उडी मारून वाचवले प्राण !

सांगलीतील गावभागात पूरपरिस्थितीत रात्री ७ वाजता सिटी हायस्कूल रस्त्यावर एक वृद्ध गृहस्थ पाण्यातून वाट काढत बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते. पाण्याला वेग अधिक असल्याने ते त्यात पूर्णत: बुडाले. त्या वेळी गावभाग येथील भाजपचे नगरसेवक श्री. युवराज बावडेकर हे बोटीतून जात होते. त्यांना हे गृहस्थ पाण्यात बुडतांना दिसताच त्यांनी पाण्यात उडी मारली आणि त्या आजोबांचा जीव वाचवला. यानंतर श्री. बावडेकर यांनी या वृद्ध गृहस्थांना त्यांच्या घरी पोचवले.