शांततेत निवडणूक घेण्यासाठी भारतालाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये निमंत्रित करू ! – विरोधी पक्षांची इम्रान खान सरकारवर टीका

पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुकीच्या वेळी हिंसाचार !

  • ‘भारतात हिंसाचाराविना निवडणुका होतात का ?’ असा प्रश्‍न भारतियांच्या मनात यावरून येईल !
  • शांततेतच निवडणुका घेण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी भारताला तेथे जायलाच हवे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये २५ जुलै या दिवशी पाककडून निवडणुका घेण्यात आल्या. त्या वेळी झालेल्या हिंसाचारात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाच्या २ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य एका घटनेत २ जणांचा मृत्यू झाला. जमात-ए-इस्लामी या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणात ५ पोलीसही घायाळ झाले. या हिंसाचारावर विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी इम्रान खान यांच्यावर टीका करतांना ‘तुमच्यापेक्षा भारत चांगला असून कमीत कमी मतदानाच्या वेळी तेथे हिंसाचार तरी होत नाही. आम्ही त्यालाच येथे निवडणुका घेण्यासाठी निमंत्रित करू’, असे म्हटले आहे. निवडणूक अधिकारी रशिद सुलेहरिया यांनी या हिंसाचाराचा निषेध केला. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला काठावर बहुमत मिळाले आहे.