पाकचे पंतप्रधान इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये २ जनमत चाचण्या घेणार !

‘भारतात रहायचे कि पाकमध्ये ?’आणि ‘पाकमध्ये रहायचे कि स्वतंत्र काश्मीर हवे ?’ याविषयी जनमत चाचण्या घेणार

  • पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तेथे अशा प्रकारची चाचणी घेण्याचा पाकला कोणताही अधिकार नाही. भारताने आता वेळ दवडण्यापेक्षा थेट सैनिकी कारवाई करून पाकव्याप्त काश्मीर भारताच्या कह्यात घेतला पाहिजे, अशीच राष्ट्रप्रेमींची इच्छा आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील सभेमध्ये बोलतांना तेथे २ जनमत चाचण्या घेण्याची घोषणा केली. पहिल्या चाचणीमध्ये ‘पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना भारतामध्ये रहायचे कि पाकमध्ये ?’ हे ठरवले जाणार आणि त्यानंतर दुसर्‍या चाचणीमध्ये ‘जर पाकमध्ये रहायचे ठरले, तर स्वतंत्र रहायचे कि पाकमध्येच रहायचे ?’ असे जनमत घेतले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इम्रान खान म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरला पाकिस्तानचा प्रांत बनवणार नाही. काश्मीरला प्रांताचा दर्जा देण्याविषयीच्या चर्चा चुकीच्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावानुसार काश्मीरमधील नागरिकांना त्यांचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार मिळेल. त्याच वेळेस काश्मीरमधील लोक पाकिस्तानमध्ये सहभागी होण्याविषयी निर्णय घेऊ शकतील.