उद्योगाकडे समष्टी साधना म्हणून पाहिल्यास आनंद मिळण्यासह समस्यांचेही निराकरण होईल ! – रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी’ उद्योगसमूह

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन उद्योजक-व्यापारी परिसंवाद’

कोल्हापूर – उद्योगाच्या प्रारंभीच्या काळात मला आलेल्या अडचणी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनुसार साधना केल्यावर सहजतेने सुटल्या. याच प्रकारे व्यापारी-उद्योजक यांनी सनातन संस्थेने सांगितलेल्या नाम, सत्संग, सत्सेवा या मार्गाने साधना केल्यास त्यांचीही संकटे दूर होऊ शकतात. उद्योगाकडे समष्टी साधना म्हणून पाहिल्यास आनंद मिळेल आणि समस्यांचेही निराकरण होईल, असे मार्गदर्शन ‘पितांबरी’ उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘व्यवसाय, उद्योग आणि वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी साधनेचे महत्त्व’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ते बोलत होते.

या परिसंवादासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आणि गोवा राज्य येथील ४५० उद्योजक-व्यापारी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी परिसंवादाचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांची सद्यःस्थिती अन् उद्योजकांचे धर्मसंस्थापनेच्या कार्यातील योगदान’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

१. आनंद आणि सुख यांच्यातील भेद मला सनातन संस्थेत आल्यावर समजला. व्यापारी-उद्योजक यांनी चांगल्या मार्गाने धन कमवणे आणि ते ईश्वरी कार्यासाठी अर्पण करणे, ही त्यांची सध्याच्या काळातील साधनाच आहे.

२. ‘उद् + योजक म्हणजे उद्योजक’, (उद् म्हणजे वरच्या दिशेने आणि योजक म्हणजे प्रगती करणे) अशी व्याख्या मला परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांनी सांगितली. यानंतर मीही माझ्या कर्मचारी वर्गासाठी सत्संग, तसेच अन्य मार्गदर्शन ठेवण्यास आरंभ केला. आमच्या आस्थापनातील कर्मचारी आणि अधिकारी हे नियमितपणे प्रार्थना अन् नामजप करतात. त्यामुळे बाहेरच्या जगात जरी कलियुग असले, तरी आमच्या आस्थापनात मात्र सात्त्विक वातावरण आहे. अशाच प्रकारे प्रत्येकाने ईश्वराला शरण जाऊन कृती केल्यास आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण करू शकतो.

३. माझी साधना जशी वाढत गेली, तशी मला अनेक समस्यांची उत्तरे आपोआप मिळायला लागली. ही उत्तरे आपल्याला विश्वमन आणि विश्वबुद्धी यांतून मिळतात. ईश्वर आपल्याला प्रत्येक प्रसंगात साहाय्य करतो, याची अनुभूती मी घेतली आहे, तुम्हीही ती घेऊ शकता.

अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी धर्माची कास धरणे हाच एकमेव उपाय ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. मनोज खाडये

१. कोरोना महारामारीच्या माध्यमातून सध्या चालू असलेले जैविक युद्ध आण्विक युद्धाकडे जाईल. त्या वेळी उद्भवणारी परिस्थिती ही भयावह असेल. त्यामुळे या पुढील काळात अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी धर्माची कास धरणे, हाच एकमेव उपाय आहे.

२. हलालसारख्या उत्पादनांवर बहिष्कार टाकणे, त्याविषयी जागृती करणे, ही उद्योजक-व्यापार्‍यांची साधनाच आहे.

३. अमेरिकेसारख्या देशांनी विज्ञानात प्रगती केली असूनही कोरोना संसर्गासमोर त्यांना गुडघे टेकावे लागले. त्यांनाही हिंदु धर्मात असलेल्या प्रथा-परंपरा यांचे पालन करावे लागले. यातूनच हिंदु धर्म आणि अध्यात्म यांचे महत्त्व लक्षात येते. दुर्दैवाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सर्वधर्मसमभाव स्वीकारल्याने कोट्यवधी लोक धर्मशिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे या आपत्काळात धर्माची कास धरून बाहेर पडता येते, हे आम्हाला समजले नाही.

विशेष

उद्योजकांना पुढील कार्याची दिशा मिळण्यासाठी प्रत्येक रविवारी रात्री ८ ते ९ या वेळेत ‘ऑनलाईन उद्योजक सत्संग’ चालू करण्यात येणार आहे.