पुणे – महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रथमच अंतर्गत मूल्यमापन करून दहावीचा निकाल घोषित केला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर ४८ विद्यार्थी शाळा आणि शिक्षकांच्या संपर्कात नसल्याने त्यांचे अंतर्गत मूल्यमापन झाले नाही. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे शंभर प्रतिशत असून राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल घोषित केला. कोरोनाची परिस्थिती न सुधारल्यामुळे राज्यशासनाच्या निर्णयानुसार अंतर्गत मूल्यमापन करून निकाल लावण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.