सिंधुदुर्ग – कोरोनामुक्त गावांमध्ये १५ जुलैपासून इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अद्यापही कायम आहे. त्यामुळे सध्यातरी १५ जुलैपासून जिल्ह्यात शाळा चालू करणे शक्य नाही. कोरोनाचा संसर्ग जसा उणावेल, तसा आढावा घेऊन शाळा चालू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ७४३ गावांपैकी ३०८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत, तर ४३५ गावांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग उणावला असला, तरी पूर्णत: थांबलेला नाही. त्यातच कोरोनाच्या तिसर्या लाटेची चेतावणीही देण्यात आली असून याचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता सध्या शाळा चालू करणे अशक्य आहे, असे के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.