(म्हणे) ‘आप’ सत्तेवर आल्यास गोमंतकियांना प्रतिमाह ३०० युनिट वीज विनामूल्य, थकित वीजदेयके माफ करणार, २४ घंटे वीजपुरवठा, शेतकर्‍यांना शेतीसाठी विनामूल्य वीज !’

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची गोमंतकियांना विविध आमिषे

अशी आमिषे दाखवून लोकप्रतिनिधी जनतेला लाचार बनवतात. विनामूल्य मिळणार्‍या गोष्टीचे जनतेला कधीच मूल्य समजणार नाही. त्यामुळे ती विजेची बचत न करता कशीही वापरेल. जनतेला लाचार बनवून स्वतःचा स्वार्थ साधणारे राजकीय नेते देशद्रोहीच होत !

पणजी, १४ जुलै (वार्ता.) – ‘आम आदमी’ पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ सत्तेवर आल्यास गोमंतकीय कुटुंबियांना प्रतिमाह ३०० युनिट वीज विनामूल्य देण्याची घोषणा येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली, तसेच थकित वीजदेयके माफ करणार, २४ घंटे वीजपुरवठा करणार आणि शेतकर्‍यांना शेतीसाठी विनामूल्य वीज देण्याचीही घोषणा केली. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गोवा दौर्‍यावर आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘‘केजरीवाल’ जे सांगतो, ते नेहमी करतो. गोव्यात अतिरिक्त वीज आहे; मात्र त्याचे वितरण हे महत्त्वाचे सूत्र आहे.’’ पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्रकारांनी गोव्यातील कोळसा प्रदूषणाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही.