काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसमध्ये २ गट पडले आहेत ! – काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप

मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपवर जोरदार टीका करतांनाच त्यांनी अनेकदा महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरही सडकून टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीतील नेते अप्रसन्न आहेत, तसेच आता काँग्रेसमध्येही नाना पटोले यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अप्रसन्नता पहायला मिळत आहे. या कारणास्तव पटोले यांच्यामुळे काँग्रेसमध्ये २ गट पडले असल्याचा आरोप काँग्रेसमधील काही नेत्यांनी केला आहे. यासाठीच आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देहली येथे जाऊन थेट राहुल गांधी यांच्याकडे पटोले यांची तक्रार करणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१. मंत्रीमंडळ स्थापनेच्या वेळी नाना पटोले यांनी स्वत:ला ऊर्जा खाते मिळावे, यासाठी पक्षश्रेंष्ठीकडे शिफारस केली होती, असेही म्हटले जाते; मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड केली, तर राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते सोपवले.

२. यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस चालू असल्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी तर नानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खनिकर्म महामंडळाविषयी एक पत्र लिहिले होते. त्यात नागपूर खनिकर्म महामंडळाकडून कोळसा पुरवठा आणि कोळसा ‘वॉशिंग’चे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती.

३. यात नियमबाह्य प्रक्रिया झाली असून हे प्रकरण आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी केली होती. हे प्रकरण राऊत यांच्या ऊर्जा खात्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.