सामाजिक माध्यमांद्वारे फसवणूक करणार्‍यांवर एम्.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यात यावी ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद

पुण्यातील आरोपीने ५७ मुलींना फसवल्याचे प्रकरण

पुणे – राज्यात सामाजिक माध्यमांवर कार्यरत असलेल्या मुलींवर पाळत ठेवून त्यांना फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात योगेश गायकवाड या आरोपीने जवळपास ५७ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने मुलींची आर्थिक फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे निदर्शनास आले आहे. अशा आरोपींवर ‘एम्.पी.डी.ए.’ (याद्वारे सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा-सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कारवाई करता येते) अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत.

डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पोलीस महासंचालकांना केलेल्या सूचना :

१. आरोपीने आणखी काही तरुणींना फसवले आहे का ? हे तपासण्यासाठी महिला पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती करावी. गुन्हे अन्वेषण विभागाने वारंवार महिलांची फसवणूक करणार्‍या सराईत गुन्हेगारांची सूची सर्व पोलीस ठाण्यांत देऊन यांच्यावर देखरेख करणारी यंत्रणा उभारण्यासंदर्भात सूचना देण्यात यावी.

२. सध्या सामाजिक माध्यमांचा वापर मुलींना फसवण्यासाठी होत असल्याने सर्व स्तरांवरील मुली आणि महिला यांना जागृत करण्यासाठी पोलीस ठाणे, तसेच महिला आणि बालविकास विभाग यांच्या वतीने भरोसा सेल अन् महिला दक्षता समिती यांद्वारे शाळांमधून जागृतीचे कार्यक्रम हाती घ्यावेत.