आसुरी शक्तींचे थैमान !

आईचा खून करून तिचे हृदय, यकृत यांसारखे अवयव कापून शिजवण्यास घेणार्‍या युवकाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ८ जुलै या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात ही घटना ४ वर्षांपूर्वीची आहे; पण हे वृत्त आता प्रसिद्ध झाले, तेव्हा क्षणभर वाचणारा प्रत्येक जण स्तब्ध झाला. ‘दारू प्यायला आईने पैसे दिले नाहीत’, हे खुनाचे कारण होते. इतके दिवस ‘दारूसाठी नवरे बायकांना मारतात’, हे नित्याचे होते; परंतु ‘दारूसाठी मुलाने आईचा विविध शस्त्रांनी खून करून तिचे विविध अवयव काढून ते खाण्यासाठी शिजवायला घेणे’ हे नरभक्षकासमान भयानक कृत्य होणे, हे अतिशय चिंताजनक आहे. व्यसन मानवाला कसा खरोखरचा असुर बनवते, याचे हे मोठे जिवंत उदाहरण आहे. वाचणार्‍याच्या अंगावर काटा आणणारी ही घटना म्हणजे अनेक गोष्टींचा दुर्दैवी परिणामच आहे. यात संस्कार, धर्माचरण, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव इथपासून ते दारूच्या अवैध धंद्यांपर्यंत अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

एकप्रकारच्या नशा आणणार्‍या गोळ्या शिकार करतांना किंवा डुक्कर मारून खातांना खाल्ल्या जातात. त्या गोळ्यांचा परिणाम असा होतो की, प्रत्येक गोष्टीकडे शिकार म्हणून पहाता येते. अशी माहिती यासंबंधीच्या वृत्तात प्रसिद्ध झाली आहे. आत्महत्या, अपहरण, खून यांच्या मुळाशी विकृती, निराशा, ईर्ष्या अशी मानसिक कारणे आढळतात. त्यामुळे विकृत प्रवृत्तींना शोधून त्यांचे मानसोपचारतज्ञांकडून समुपदेशन करून घेणे, ही  आव्हानात्मक गोष्ट आहे. सर्वसामान्य करू धजावणार नाही, असे खुनासारखे विकृत गुन्हे हे मानवातील आसुरी प्रवृत्तीचे द्योतक असल्याने शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांना धर्माचरण शिकवण्याचे महत्त्व अधोरेखित होते. पाश्चात्त्य साहित्यात भुतांवर नाटके असतात; पण भारतीय साहित्यात प्राचीन काळापासून आसुरी प्रवृत्तीचा नाश करण्याची शिकवण आहे. सध्या चित्रपट, मालिका यांतून गुन्हेगारीचा परिपोष झाल्याचे दाखवले जात असल्याने समाज त्याचे अनुकरण करतो. साधना करणारा कठीण परिस्थितीतही टोकाचे पाऊल उचलत नाही. सात्त्विक समाजाची निर्मिती होणे, हीच आसुरी गुन्हे टाळण्यावरील अंतिम उपाययोजना आहे. सत्त्वप्रधान समाजासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती होणे आवश्यक आहे !