म्यानमारमध्ये सैन्याचा विरोध करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांवर अत्याचार

  • १५७ आरोग्य कर्मचार्‍यांना अटक

  • ५१ रुग्णालयांवर सैन्याचे पूर्ण नियंत्रण

  • लसीकरण थांबले !

म्यानमारमध्ये सैन्याची ही दडपशाही पहाता तेथे मानवाधिकार अस्तित्वात नाही, हे स्पष्ट होते ! याविषयी जगातील मानवाधिकार संघटना गप्प का आहेत ?

यांगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये सैन्याने बंडखोरी करत सत्ता स्वतःच्या नियंत्रणात घेतल्यापासून जनतेकडून विरोध केला जात आहे. विरोध करणार्‍यांवर सैन्य आणि पोलीस यांच्याकडून अत्याचार केले जात आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांकडूनही सैन्याचा विरोध झाल्यामुळे आता त्यांनाही देशद्रोही वा बंडखोर म्हणून मारहाण केली जात आहे. अशा ४०० डॉक्टर्स आणि १८० परिचारिका यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. आतापर्यंत १५७ आरोग्य कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली आहे. जवळपास ५१ रुग्णालये पूर्णपणे नियंत्रणात घेण्यात आली आहेत. रुग्णांवर उपचार चालू असतांनाही सैनिक आणि पोलीस रुग्णालयात घुसून डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण करत आहेत. डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कर्तव्य पार न पाडणे आणि देशद्रोह अशा आरोपांखाली खटले भरले जात आहेत. त्यांची हत्याही केली जात आहे. यामुळे कोरोनाविषयीचे लसीकरणही थांबले आहे.