‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) !

‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पुणे येथील सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पहात आहोत. ५ जुलै या दिवशी आपण पू. (सौ.) संगीता पाटील यांचे वैवाहिक जीवन, त्यांचा सनातन संस्थेशी झालेला संपर्क आणि त्यांना आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज आपण उर्वरित भाग पाहूया. 

(भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/492258.html

पू. (सौ.) संगीता पाटील

बालपणापासूनच कष्टप्रद जीवन जगणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांची देवावरील श्रद्धा मुळीच ढळली नाही. लहानपणी अनेक मंदिरांत भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत झाली आणि देवावरील त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे श्री गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या कृपाप्रसादे त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली. त्यांच्या भावबळामुळेच जीवनातील अत्यंत खडतर प्रसंगी, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातही प्रभूला त्यांच्या समवेत यावे लागले. त्यांना डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसूनही गुरुकार्याची तळमळ, भाव आणि गुरूंवरील अढळ श्रद्धा या गुणांच्या बळावर त्यांनी ‘संतपद’ प्राप्त केले. त्यांची गुरूंवरील अपार श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ सर्वच साधकांना साधनेत प्रोत्साहन देणारी आहे.

‘अतिशय खडतर बालपण असूनही साधनेवर श्रद्धा ठेवून साधना करणारे कुणी असू शकते, यावर विश्वास बसणे कठीण आहे ! पू. (सौ.) संगीता पाटील यांचे कौतुक करावे तेवढे अल्प !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

९. गुरुदेवांच्या कृपेने समाजातील व्यक्तींकडून लाभलेला प्रतिसाद !

९ अ. समाजातील व्यक्तींकडे संपर्कासाठी जातांना गुरुदेवांना प्रार्थना केल्यामुळे कुठल्याही घरात प्रवेश केल्यावर तिथे चैतन्य जाणवणे

मी समाजातील व्यक्तींकडे संपर्कासाठी जातांना गुरुदेवांना प्रार्थना करते, ‘गुरुदेवा, मला व्यवस्थित बोलता येत नाही. मला रंगरूप नाही. जो आहे, तो सगळा तुमचाच गंध आहे. तुम्ही समवेत असाल, तरच माझी साधना होते. मला स्वतःला काही येत नाही.’ अशी प्रार्थना करत असल्यामुळे मी कुठल्याही घराचा उंबरठा ओलांडल्यावर त्या घरात चैतन्य निर्माण होत असल्याचे मला आणि इतरांनाही जाणवते.

९ आ. पोलिसांना प्रेमाने सांगितल्यावर ते सात्त्विक उत्पादने घेऊ लागणे आणि ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही होणे

एकदा मी एका पोलीस अधिकार्‍यांकडे गेले होते. मी त्यांना माझ्याकडील ‘सनातन प्रभात’चे अंक वाचायला दिले. त्यानंतर मी पोलिसांच्या वसाहतीत जाऊन २ – ३ ठिकाणी माझ्याकडील अंक दिले. (आरंभी मला तेथील लोकांनी ‘पोलीस अधिकार्‍यांकडे जाऊ नका. काही लाभ होणार नाही’, असे सांगितले होते; परंतु मला मात्र तेथे चांगला अनुभव आला.) मी त्यांना साधना सांगितली. तेव्हापासून ते सनातनची सात्त्विक उत्पादने घेऊ लागले. त्यांनी रविवारचे दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंकही चालू केले. तेथील पोलीस मला त्यांच्या घरातील अडचणी सांगायचे. तेव्हा मी त्यांना सांगायचे, ‘‘तुम्ही क्षमायाचना करा. काही चुकत असल्यास देवाची क्षमा मागा. चांगल्या मार्गाने पैसे मिळवा. कुलदेव आणि दत्त यांचा नामजप करा.’’ नंतर ते ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही झाले.

९ इ. एका राजकारण्यांकडे गेल्यावर आलेली अनुभूती

एका राजकारण्यांनी सनातनची २ पंचांगे घेतली होती. त्यांनी १ पंचांग घरी ठेवून दुसरे मंदिरात लावण्यासाठी ते घेऊन जात होते. त्याच वेळी त्यांच्यावर आक्रमण झाले; परंतु पंचांग हातात असल्यामुळे ते वाचले होते. त्यामुळे त्यांचा सनातनवर पुष्कळ विश्वास बसला. तेव्हापासून ते मला ‘आई’ म्हणतात. मी त्यांच्याकडे गेले, तर तेथे त्यांच्याकडे आलेल्या लोकांच्या समक्षच ते माझ्या पाया पडतात. मी त्यांना थांबवते; पण ते ऐकत नाहीत. ते सनातनची उत्पादने आणि गोमूत्रअर्काच्या ५० ते १०० बाटल्या घेतात. गुरुपौर्णिमेचे अर्पण देतांनाही ‘किती हवे ?’, असे विचारतात.

९ ई. गुरुदेवांना प्रार्थना करताच एका घरातील भांडण थांबणे

एकदा मी एका घरात गेले. तेव्हा त्या घरात भांडण चालू होते. समजावूनही कुणी ऐकत नव्हते. प्रकरण हमरीतुमरीवर आले होते. मी गुरुदेवांना प्रार्थना केली आणि थोड्याच वेळात ते भांडण थांबले. अशा अनुभूती मला पुष्कळ वेळा येतात.

१०. अनिष्ट शक्तींचा झालेला त्रास

‘वर्ष २००९ मध्ये एकदा मी कामावरून आले. तेव्हा ‘मला काहीतरी होत आहे’, असे रात्री १० वाजेपर्यंत मला जाणवत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास माझे डोके पुष्कळ दुखायला लागले आणि मला झटके (फीट येऊन बेशुद्ध होणे) येऊ लागले. तेव्हा माझ्या यजमानांनी आमच्या खालच्या माळ्यावर रहाणार्‍या एका काकांना बोलावले. त्या वेळी लोकांना वाटले, ‘‘या गेल्या.’’ त्या काकांनी यजमानांना सनातनच्या साधकांना बोलावण्यास सांगितले. तेव्हा रात्र झाली असूनही सनातनचे साधक श्री. ढोबळेकाका यांनी घरी येऊन अत्तर आणि कापूर लावणे, सात्त्विक उदबत्ती लावणे, खोके लावणे, आवरण काढणे, यांसारखे आध्यात्मिक उपाय केले. नंतर मी ‘कृष्ण, कृष्ण’, असे म्हणत शुद्धीवर आले.

रात्री मला रुग्णालयात नेले. श्री. ढोबळेकाकांनी रुग्णालयातही माझ्यावर नामजपादी उपाय केले. नंतर माझे ‘सीटी स्कॅन’ करण्यात आले. त्याचा अहवाल पाहून आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘यांना काहीच झाले नाही. यांना घरी न्या.’’ हा अनिष्ट शक्तींचा त्रासच होता.

११. रामनाथी आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी झालेली भावस्पर्शी भेट !

मी रामनाथी आश्रमात आल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (आताच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्हाला कधी भेटते ?’, असे मला वाटत होते.’’ त्यांनी अत्यंत आपुलकीने माझ्या घरच्या परिस्थितीविषयी विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेव सर्व बघतील.’’

तेव्हा मला वाटले, ‘जीवनात १०० धागे दुःखाचे असले, तरी एक धागा सुखाचा असतोच’, हे मला आज अनुभवायला मिळाले.’

१२. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेली अनुभूती

अ. मला रामनाथी आश्रमात आल्यावर श्री लक्ष्मी-नारायण यांचे अस्तित्व जाणवले. ‘श्री लक्ष्मी-नारायण यांच्यावर अभिषेक होत आहे. सगळे जण त्यांच्या चरणांना स्पर्श करत आहेत.’ हे मला आधीही जाणवले होते.

आ. मला गुरुदेवांची खोली ठाऊक नव्हती; परंतु मला स्वप्नात त्यांची खोली दिसली होती. मी रामनाथी आश्रमात आल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मला स्वप्नात दिसलेल्या जागीच गुरुदेवांची खोली आहे.

इ. लागवडीतील वृक्ष पाहून मला आनंद झाला. ती झाडे म्हणजे पूर्वजन्मातील साधक आहेत. त्या वृक्षांचीही साधना आहे.

१३. साधनेत आल्यावर जाणवलेले पालट

पूर्वी मला ‘माझा रंग काळा आहे’, याचे वाईट वाटायचे. लोक मला टोचून बोलायचे, ‘‘तुम्ही ब्राह्मणाच्या घरी वाढलात. मग तुमचे रंग-रूप असे कसे आहे ?’’

आता मला वाटते, ‘ते अज्ञानी होते. त्या वेळी मीही अज्ञानी असल्याने लोकांचे बोलणे ऐकून मला राग यायचा; परंतु आता ‘कृष्णाने माझ्याकडून साधना करवून घेऊन मला सुंदर घडवले आहे’, या विचाराने मी आनंदात आहे.

(समाप्त)

– (पू.) सौ. संगीता पाटील, भोसरी, पुणे (२४.३.२०१९)

ओघवत्या वाणीतून साधकांना भावविश्वात डुंबवणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

‘पू. (सौ.) संगीता पाटील यांनी रामनाथी आश्रमात आल्यानंतर केलेल्या मार्गदर्शनातून पुढील सूत्रे जाणवली.

१. ‘पू. (सौ.) संगीता पाटील यांनी सुंदर मार्गदर्शन केले आहे. त्या संत जनाबाई, संत सखूबाई यांच्याप्रमाणे देवाची भक्ती करत आहेत. या संतांप्रमाणेच त्यांनी कठीण परिस्थितीत देवाचे साहाय्य घेऊन आध्यात्मिक उन्नती केली.

२. त्यांनी ओघवत्या वाणीतून गुरूंचे गुणवर्णन आणि त्यांचे अनुभव सांगितले. ते ऐकून आम्ही सर्व भगवंताच्या चैतन्यात न्हाऊन निघालो. ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे आम्हाला वाटत होते. त्यांनी आम्हाला भावविश्वात (गुरुदेवांच्या विश्वात) डुंबवले.

३. त्यांनी सांगितलेली सूत्रे साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक आहेत.’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०१९)

(पू.) सौ. संगीता पाटील यांनी साधकांसाठी दिलेला संदेश

अ. ईश्वर एका क्षणात काहीही घडवू शकतो. आपण अपेक्षा करायची नाही. आपण केवळ गुरुदेवांच्या चरणांवर लीन रहायचे.

आ. जीवनात कितीही बिकट प्रसंग आला, तरीही साधना सोडायची नाही.

इ. साधकांनी स्वतःची चूक मान्य करावी आणि तिच्यातून शिकून स्वतःत पालट घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. मनात अपराधी भाव ठेवावा. गुरुदेवांचे सतत स्मरण करावे.

ई. ज्यांना गुरुप्राप्ती झाली नसेल, त्यांना सांभाळणारे गुरुदेवच आहेत.

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक