पायी वारीसाठी निघालेले संतवीर बंडातात्या कराडकर यांना कह्यात घेऊन सोडले !

(सौजन्य : टी.व्ही.९ मराठी)

पुणे – पंढरपूर येथे जाण्यासाठी पायी वारीला प्रारंभ केल्यामुळे संतवीर बंडातात्या कराडकर यांना ३ जुलै या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कह्यात घेतले होते. (हे राष्ट्र भारत आहे कि पाकिस्तान ? – संपादक) भाजपचे शहराध्यक्ष आणि स्थानिक आमदार महेश लांडगे यांनी बंडातात्या कराडकर आणि वारकरी यांच्यामध्ये मध्यस्थी केली. २ घंटे झालेल्या चर्चेनंतर शेवटी बंडातात्या यांनी गाडीतून पंढरपूरला जाण्याची सिद्धता दर्शवली; मात्र ‘माझ्यासमवेत असलेल्या वारकर्‍यांना पायी पंढरपूरला जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी त्यांनी केली. पिंपरी-चिंचवड पोलीस त्यांना घेऊन वाहनातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.

संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला होता. ‘पायी चालणे हा गुन्हा असेल, तर प्रतिदिन तसे लाखो गुन्हे नोंद करा. सर्वसामान्य नागरिकांचा पायी चालणे, हा हक्क सरकार काढू शकत नाही’, अशी भूमिका बंडातात्या यांनी घेतली होती.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शासनाने पायी वारीला मनाई करतांना मानाच्या पालख्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूरला नेण्याची अनुमती दिली आहे. शासनाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना संतवीर बंडातात्या कराडकर यांनी ‘शासनाने सर्व पारमार्थिक क्षेत्रे बंद केली आहेत. मंदिरे, कीर्तने, भजने, नामसप्ताह बंद आहेत; मात्र राजकीय मेळावे, पुढार्‍यांच्या सभा, जेवणावळ्या बिनबोभाट चालू आहेत. असे असतांना केवळ वारीसाठी बंधने घालणे आम्ही मान्य करू शकत नाही’, अशी भूमिका समस्त वारकर्‍यांच्या वतीने मांडली. तसेच पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वारकर्‍यांनी ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आता परिणाम भोगायला सिद्ध रहावे ! – भाजप

आचार्य तुषार भोसले

पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना कह्यात घेतल्याच्या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले म्हणाले, ‘‘पोलिसांची ही कारवाई निषेधार्ह आहे. मोगलांनीही वारकर्‍यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणारे संतवीर बंडातात्या कराडकर आणि वारकरी यांना कह्यात घ्यायला सरकारला लाज कशी वाटत नाही ? तुमचे डोके ठिकाणावर आहे का? शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आता परिणाम भोगायला सिद्ध रहा.’’

या वेळी आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची अनुमाने ७०० वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी आषाढी वारीसाठी पायी पालखी सोहळा निघतो; मात्र गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे पायी पालखी सोहळा करता आलेला नाही. मी स्वत: वारकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या भावनेशी मी सहमत आहे; पण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. पालखी सोहळ्याला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.’

संतवीर बंडातात्या कराडकर यांना पुणे पोलिसांनी कह्यात घेतल्याच्या विरोधात वारकर्‍यांचे ‘भजन आंदोलन’

पुणे – कोरोनाचे नियम पाळून पायी वारी करण्याची विनंती करणारे संतवीर बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कह्यात घेतल्यामुळे वारकरी आक्रमक झाले आहेत. पायी वारीसाठी आग्रही असणार्‍या वारकर्‍यांनी ‘संकल्प गार्डन मंगल कार्यालया’च्या बाहेर ‘भजन आंदोलना’स प्रारंभ केला आहे. भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे हे वाकर्‍यांच्या भेटीसाठी वरील मंगल कार्यालयात गेले होते.

कराडला कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या विजयोत्सवात १० सहस्र कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला, तेथे कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण नव्हते का ? – संतवीर बंडातात्या कराडकर

संतवीर बंडातात्या कराडकर म्हणाले, ‘‘आम्हाला पंढरपूरपर्यंत विनाअडथळा चालू द्या. मला अधिक बोलायला लावू नका. १ जुलैला कराडला कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या विजयोत्सवात १० सहस्र कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला, तेथे कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण नव्हते का ? कोरोनाचे नियम आम्हाला मान्य आहेत. उद्या सकाळी आम्ही पुन्हा चालू आणि चालतांना एकमेकांमध्ये ३ फुटांचे अंतर वारकर्‍यांमध्ये ठेवू. चालण्यासाठी वारकर्‍यांची २५ ही संख्या निश्‍चित केली, तरी आम्हाला मान्य आहे. त्यापेक्षा संख्या वाढणार नाही, हे मी लिहून देतो. आता घरी जाऊ; पण उद्या सकाळी पुन्हा वारीत चालू.’’

संतवीर बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले ? – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई – ‘वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय आहे. संतवीर बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधले ? काहीच मध्यम मार्ग नव्हता का ? वारकर्‍यांचा असा अपमान ? थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे’, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत संतवीर बंडातात्या कराडकर यांच्यावरील कारवाईविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सध्या बंडातात्या हे कराड पोलिसांच्या कह्यात असून त्यांना कराडमध्ये स्थानबद्ध करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. आंदोलन स्थगित झाले असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.