पुणे, २ जुलै (वार्ता.) – पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील वारकर्यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहन करणार्या संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातून आळंदी आणि परिसरातील पोलिसांना कारवाई करण्याविषयीची सूचना देण्यात आली. बंडातात्या कराडकर आळंदी परिसरात असल्याचा व्हिडिओ याआधी प्रसारित झाला होता.
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील श्रींचे मानाचे ‘हिरा’ आणि ‘मोती’ अश्व आळंदीत दाखल
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील प्रथा-परंपरांचे पालन करीत श्रींचे मानाचे हिरा आणि मोती अश्व अंकली बेळगाव येथून अलंकापुरीत हरिनाम गजरात दाखल झाले आहेत. १ जुलै या दिवशी देवस्थानच्या वतीने पालखी सोहळ्यातील परंपरेप्रमाणे अश्वांचे स्वागत करण्यात आले.
अश्व माऊली मंदिरात आल्यानंतर पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रींच्या अश्वांचे स्वागत केले. आळंदी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर कारंजा मंडपात सोहळ्यासह संस्थानच्या वतीने अश्वपूजा झाली.
कोरोना सावटाच्या पार्श्वभूमीवर आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा साजरा
ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या तालावर २ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरापासून पालखी सोहळ्याच्या प्रस्थान कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रतीवर्षी सकाळपासूनच संपूर्ण अलंकापुरी ज्ञानोबा-तुकोबांच्या गजराने दुमदुमून निघते; मात्र यंदा आळंदीच्या नगराध्यक्षांसह अनुमाने ३७ वारकर्यांना कोरोनाची लागण झाल्याने नदीच्या परिसरात शुकशुकाट होता. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दी न होण्याच्या दृष्टीने मंदिराचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्याकडून काळजी घेतली जात आहे.
प्रशासनाकडून मर्यादित वारकर्यांनाच अनुमती देण्यात आली आहे. ३ ते १९ जुलै या कालावधीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आजोळ घरीच मुक्कामी रहाणार असून १९ जुलै या दिवशी सकाळी १० वाजता पादुका पंढरपूरकडे निघतील. त्यानंतर १९ ते २४ जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी असणार आहेत आणि २४ जुलैला पौर्णिमेचा प्रसाद घेऊन शासकीय बसने परतीच्या प्रवासाला निघतील.