(म्हणे) ‘चीनवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास ठेचून टाकू !’

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची चेतावणी !

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! चीन भारतासह अनेक देशांवर दबाव निर्माण करून जागतिक महाशक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचा हा प्रयत्नच जगाने संघटित होऊन ठेचून काढण्याची आवश्यकता आहे !

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग देशाला संबोधित करताना

बीजिंग (चीन) – चीन कुठल्याही विदेशी शक्तींच्या दादागिरीला आणि दबावाला बळी पडणार नाही वा कुणाच्या ताटाखालचे मांजर बनणार नाही. तसा कुणी प्रयत्न केलाच, तर त्याचे डोके १४० कोटी चिनी जनता ठेचेल, अशी चेतावणी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीनिमित्त देशाला संबोधित करतांना दिली. येथील प्रसिद्ध तिएनमेन चौकात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला ७० सहस्रांहून अधिक संख्येने उपस्थित असलेल्या चिनी नागरिकांसमोर जिनपिंग बोलत होते.

शी जिनपिंग म्हणाले की,

१. चिनी नागरिकांची प्रबळ इच्छाशक्ती, निश्‍चय आणि त्यांची शक्ती यांना न्यून लेखता कामा नये. चीनला कुणी धमकी द्यावी अथवा दबाव टाकावा, असा प्रयत्नही कुणी करू नये.

२. चीनने कोणत्याही देशाला धमकावलेले नाही, ना त्यांच्यावर दबाव टाकला आणि ना एखाद्या देशाच्या नागरिकांना अंकित केले आहे. चीन यापुढेही असे करणार नाही. (श्रीलंका, पाकिस्तान,  बांगलादेश, माली आदी देशांच्या संदर्भात चीन जे काही करत आहे, ते काय आहे ? हे शी जिनपिंग सांगतील का ? – संपादक)

३. चिनी जनतेने १०० वर्षांमध्ये एका ध्येयाने काम केले आणि ते उद्दिष्ट गाठले. आगामी काळात चीनला भक्कम आणि प्रभावी वैशिष्ट्यपूर्ण समाजवादी देश बनवण्यात येईल. समाजवादच चीनला वाचवू शकतो. (समाजवादच चीनला एक दिवस बुडवणार, हे चिनी जनतेने कायमचे लक्षात ठेवावे ! – संपादक)

४. तैवानचा प्रश्‍न समूळ सोडवणे आणि त्या प्रदेशाचे चीनमध्ये संपूर्ण एकात्मीकरण करणे, हे आपल्या पक्षापुढे कधीही विचलित न होणारे ऐतिहासिक ध्येय आहे. (तैवान स्वतंत्र देश आहे. त्याचे चीनमध्ये एकात्मीकरण करणे, ही चीनचीच दादागिरी आहे. याचा संपूर्ण जगाने विरोध केला पाहिजे ! – संपादक)