‘देवावर अढळ श्रद्धा असेल, तर तो भक्ताच्या हाकेला धावून येतो’, याची अनुभूती घेणार्या जळगाव येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी (वय ७९ वर्षे) !
२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
३० जून २०२१ या दिवशी आपण सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत पू. (सौ.) पाटीलआजींची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेली दृढ श्रद्धा आणि भाव यांमुळे त्यांच्या गावातील लोकांना त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाहिल्या. आज आपण या मुलाखतीचा उर्वरित भाग पहाणार आहोत.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490964.html
२. रामनाथी आश्रमात आल्यावर पू. आजी आणि त्यांचे कुटुंबीय यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आधी सूक्ष्मातून आणि नंतर स्थुलातून भेटतांना पू. आजींना सारखेच वाटणे
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुम्हाला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसायचे. आता तुम्ही रामनाथी आश्रमात आलात आणि तुम्हाला प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले भेटले. ‘त्यांचे सूक्ष्मातून भेटणे अन् स्थुलातून भेटणे’ या दोन्हींमध्ये तुम्हाला काय भेद जाणवला ?
पू. (सौ.) पाटीलआजी : दोन्हींमध्ये मला काहीच भेद वाटला नाही. त्यांना स्थुलातून बघून मला पुष्कळ छान वाटले. आधी ते सूक्ष्मातून माझ्या समवेत असायचे. तेव्हा ‘ते आपल्या जवळच आहेत’, असे मला वाटायचे. मी आता इथे आले आणि डोळ्यांनी त्यांचे रूप बघितले. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेवा, तुम्ही किती महान आहात ! तुम्ही सर्वांची किती काळजी घेता !’ गुरुदेवांना आणि येथील सगळ्या साधकांना बघून मला वाटले, ‘इथे (आश्रमात) रहातात, त्यांचे पुष्कळ भाग्य आहे.’
२ आ. ‘गुरुदेवच भगवंत आहेत’, अशी पू. आजींची श्रद्धा असणे
पू. (सौ.) पाटीलआजी : मी गुरुदेवांना हाक मारायचे आणि त्यांनाच ‘आता काय करायचे ?’, असे विचारायचे. तेच माझ्याकडून सर्व करवून घेत आहेत. आपल्याकडून काही होत नाही. त्यांनीच माझ्याकडून सेवा करवून घेतली. त्यांनीच मला साधनेत आणले. भगवंतानेच मला त्याच्याकडे बोलावून घेतले. ‘गुरुदेव माझे भगवंतच आहेत’, अशी माझी श्रद्धा आहे.
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विष्णुरूपात पूर्वीच दर्शन दिल्याचे पू. आजींनी सांगणे
पू. (सौ.) पाटीलआजी : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी साधकांना विष्णुरूपात दर्शन दिले. त्यांनी मला या रूपात आधीच दर्शन दिले होते.
२ ई. गुरुदेवांना भेटल्यावर पू. आजींच्या यजमानांना देव भेटल्याचे समाधान मिळणे
कु. प्रियांका लोटलीकर : आजोबा (पू. पाटीलआजींचे यजमान), तुम्हीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटलात. त्या वेळी तुम्हाला काय वाटले ?
श्री. जामराव पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींचे यजमान) : मला देवच भेटला. ‘मला गुरुदेवांना भेटायचे आहे’, असा मी देवाचा धावाही केला होता. त्यांना भेटून माझ्या मनाला पुष्कळ समाधान मिळाले. ‘त्यांच्याशी आणखी २ घंटे बोलणे व्हायला पाहिजे होते’, असे मला वाटले.
२ उ. रामनाथी आश्रमात आल्यावर पू. आजींना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आल्याप्रमाणे प्रसन्न वाटणे आणि त्यांना आश्रमात गुरुदेवांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवणे
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, पूर्वी तुम्ही पंढरपूरला जात होता आणि आता रामनाथी आश्रमात आलात. तुम्हाला काय वाटले ?
पू. (सौ.) पाटीलआजी : मला पंढरपूरच्या मंदिरात आल्यासारखे वाटले. पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यावर तेथे प्रसन्न वाटायचे, तसेच गुरुदेवांच्या आश्रमात आल्यावर प्रसन्न वाटले. मी रामनाथीचे मंदिर आणि कळस बघितला. आश्रमातील खोल्यांमध्ये फिरले. त्या वेळी ‘इथे गुरुदेव आहेत’, असे मला वाटायचे.
कु. प्रियांका लोटलीकर : तुम्हाला आश्रमात प्रत्येक ठिकाणी गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले ना ?
पू. (सौ.) पाटीलआजी : आश्रमात फिरतांना २ – ४ ठिकाणी तरी मला ते सूक्ष्मातून दिसले.
२ ऊ. पू. आजी आणि त्यांची सून यांना आश्रमातील प्रत्येक साधकात कृष्ण अन् गुरुदेव यांचे दर्शन होणे
सौ. वनिता पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींची सून) : पू. आजींना आम्ही आश्रम पहाण्यासाठी घेऊन जात होतो. तेव्हा त्या प्रत्येक साधकाकडे बघत उभ्या रहायच्या. त्या वेळी मी त्यांना म्हणायचे, ‘‘चला.’’ त्यावर त्या म्हणायच्या, ‘‘प्रत्येक साधकात मला कृष्ण आणि गुरुदेव दिसतात. मला पुष्कळ वेगळे वाटत आहे.’’
आश्रमात आल्यावर मलाही सगळ्या साधकांमध्ये गुरुदेवांचे दर्शन झाले. मला श्रीकृष्णाचेही दर्शन झाले आणि पुष्कळ छान वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद वाटत होता.
३. रामनाथी आश्रमात आल्यावर आश्रमातील चैतन्य अनुभवण्याची पू. (सौ.) पाटीलआजींची तळमळ !
सौ. वनिता पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींची सून) : एका ताईने आम्हाला ‘सकाळी ८ वाजता ध्यानमंदिरात आरती असते’, असे सांगितले. पू. आजींना त्या आरतीला जाता आले नाही. त्या वेळी पू. आजींना त्याची पुष्कळ खंत वाटत होती. दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी पटकन आवरले. मग आम्ही आरतीला गेलो.
पू. (सौ.) पाटीलआजी : जळगावला गेल्यावर एक दिवसही आरती चुकली नाही. आरती झाली की, मी नामजपाला बसायचे.
सौ. वनिता पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींची सून) : पू. आजी सारख्या ध्यानमंदिरात जातात. त्या मला म्हणाल्या, ‘‘आपल्याला इथे किती दिवस रहायला मिळणार ? आपण इथे आहोत, तोपर्यंत मला ध्यानमंदिरात बसायचे आहे. इथले सर्व अनुभवायचे आहे.’’
पू. (सौ.) पाटीलआजी : ‘ध्यानमंदिरातून उठावे’, असे वाटतच नाही. गुरुदेव किती महान आहेत ! त्यांनी किती केले आहे !
४. प.पू. गुरुदेवांच्या भेटीच्या वेळी ‘पू. आजींचे देवाशी अनुसंधान चालू असून त्यांची दृष्टी केवळ ईश्वरालाच बघत आहे’, अशी अनुभूती साधकांना येणे आणि त्या वेळी साधकांच्या मनात केवळ देवाविषयीचे विचार येणे
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुमची प.पू. गुरुदेवांशी भेट झाली. त्या वेळी तेथे काही साधक होते. तेव्हा ‘तुमचे देवाशी अनुसंधान चालू असून तुमची दृष्टी केवळ ईश्वरालाच बघत आहे’, अशी अनुभूती त्या साधकांना आली. त्यामुळे साधकांना स्वतःचा विसर पडला. त्यांच्या मनात स्वतःविषयीचे विचार न येता केवळ देवाविषयीचे विचार आले. बिंब-प्रतिबिंब असते, तसे झाले. ‘पू. आजी सतत देवाच्या विचारात असल्याने साधकांनाही त्यांचा लाभ होत होता’, अशा अनुभूती साधकांनी सांगितल्या.
५. आजी संत होण्याच्या संदर्भात साधकांना मिळालेली पूर्वसूचना
पू. आजी परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी कार्यक्रम चालू झाल्यापासून शेवटपर्यंत तेथून न हालणे आणि तेव्हा ‘त्या संत झाल्या आहेत’, असे साधकांना जाणवणे
सौ. वनिता पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींची सून) : गेल्या वर्षी परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला पू. आजी आल्या होत्या. तो कार्यक्रम चालू झाल्यापासून शेवटपर्यंत पू. आजी तेथून हलल्या नाहीत. तेव्हा ‘आजी संत झाल्या आहेत’, असे साधकांच्या लक्षात आले. त्या वेळी साधकांना पू. आजींविषयी अनुभूतीही आल्या.
६. ‘गुरुदेवांचे चरण दिसले, तरच जेवायला बसणार’, असे पू. आजींनी ठरवणे, पुष्कळ प्रार्थना केल्यावर गुरुदेवांच्या चरणांचे दर्शन होणे आणि नंतरच त्यांनी जेवण करणे
जळगावला हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. तेथील सेवाकेंद्रात मी सकाळी मानसपूजा केली. त्यानंतर ‘गुरुदेवा, मला तुमचे चरण पाहिजेत’, असे त्यांना सांगितले. मला चरण दिसले नाहीत; म्हणून मी ‘चरण दिसले, तरच मी जेवायला बसणार’, असे ठरवले. पू. अशोक पात्रीकरकाका मला जेवण्यासाठी बोलवायला आले; पण मी गेले नाही. नंतर मी गुरुदेवांना पुष्कळ प्रार्थना केल्या. तेव्हा मला गुरुदेवांच्या श्री चरणांचे दर्शन झाले. नंतर मी जेवायला गेले.
७. पू. आजींना ‘वाईट शक्ती साधकांना त्रास देत आहेत’, असे दृश्य दिसणे
कु. प्रियांका लोटलीकर : ‘आता आपत्काळात साधकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे ? कशा प्रकारे देवावर श्रद्धा ठेवायला पाहिजे किंवा या स्थितीत कसा काळ असेल ?’, असे तुम्हाला वाटते.
पू. (सौ.) पाटीलआजी : आपत्काळात साधकांनी साधना आणि नामजप पुष्कळ वाढवायला पाहिजे.
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुम्हाला कधी आपत्काळाविषयीची दृश्ये दिसली का ?
पू. (सौ.) पाटीलआजी : मी कधीतरी सभेसाठी जायचे. तेव्हा ‘वाईट शक्ती आली आणि आडवी झाली’, असे दृश्य मला दिसायचे. मी साधकांना विनंती करून सांगायचे, ‘‘दादांनो, व्यवस्थित रहा. तुम्ही काही न करता तुमच्यावर काही आपत्ती येईल. काहीही घडेल. आपण सांभाळून रहायचे. पुष्कळ नामजप आणि प्रार्थना करा.’’ त्यांनाही ते पटायचे.
८. हिंदु राष्ट्र-जागृती जागृती सभेसाठी नामजप करतांना ‘सभेत पावसाचा अडथळा येईल’, असे पू. आजींना वाटणे, त्यांनी ‘सभा निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी पुष्कळ नामजप करणे आणि त्यानंतर पावसाचे संकट दूर होऊन सभा व्यवस्थित पार पडणे
पू. (सौ.) पाटीलआजी : सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आजी, नामजप करा. मालेगावला हिंदु राष्ट्र-जागृती सभा आहे.’’ त्या वेळी नामजपाला बसल्यावर ‘या सभेत वादळ येईल किंवा पाऊस पडेल’, असे मला वाटले; म्हणून मी अधिकाधिक नामजप करायला लागले. मग मी वायुदेव, निसर्गदेव आणि देवीमाता यांचा नामजप अन् आराधना करायला आरंभ केला. त्या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांचा मला भ्रमणभाष आला, ‘‘आजी, थोडा नामजप वाढवा. वातावरण थोडे खराब दिसत आहे.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘काहीतरी घडणार आहे’, असे मला कळले आहे.’’ पावसाचे वातावरण होते; पण नामजप वाढवल्यावर एका घंट्यात ढगांचे आवाज बंद झाले. पाऊस येण्याची लक्षणे दूर झाली.
निसर्गदेवतांनी साहाय्य केले. वायुदेवाने वादळ येऊ दिले नाही. देवीमातेनेही साहाय्य केले. त्यानंतर श्री. वाघुळदेकाकांचा भ्रमणभाष आला, ‘‘आजी, सभा व्यवस्थित पार पडली.’’
कु. प्रियांका लोटलीकर : ‘संतांनी केलेली प्रार्थना किंवा त्यांची देवावरची श्रद्धा’, यांमुळेच आज आपण जिवंत आहोत.
९. पू. (सौ.) पाटीलआजींनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, ‘साधकांनी आणखी काय प्रयत्न करायला पाहिजेत ? कसा भाव ठेवायला पाहिजे ?’, त्याविषयी थोडे सांगा.
पू. (सौ.) पाटीलआजी :
अ. ‘हे मी केले, हे माझ्यामुळे झाले’, असे कधी म्हणायचे नाही. ‘सगळे गुरुदेवांनी केले. त्यांनीच करवून घेतले. आमच्याकडून काहीच होत नाही’, असा भाव असला पाहिजे.
आ. प्रेमभाव वाढवायला पाहिजे.
इ. साधकांनी साधना करतांना दिवसभर गुरुमाऊलीला, म्हणजेच कृष्णाला ‘कृष्णा, आता पुढे काय करू ?’, असे विचारायला पाहिजे. गुरुमाऊलीला विचारून केले की, साधना आपोआप वाढते, आपला नामजप भावपूर्ण होतो, आणि प्रेमभाव पुष्कळ वाढतो.
ई. साधकांनी परिपूर्ण सेवा करायला पाहिजे.
उ. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी पुष्कळ प्रार्थना करायला हव्यात. हिंदु राष्ट्र यायला पाहिजे. सगळ्या साधकांची साधना व्हायला पाहिजे आणि साधकांभोवती संरक्षक कवच निर्माण व्हायला पाहिजे.
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजींनी आता जे सांगितले, ते साधकांनी शरणागतभावाने केले पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीत ‘मी केले’, असे न म्हणता आणि कर्तेपणा आपल्याकडे न घेता तो देवाच्या चरणी अर्पण केला पाहिजे.
‘पू. आजी रामनाथी आश्रमात आल्या. ‘त्यांची ईश्वराप्रती दृढ श्रद्धा आणि भाव आहे’, हे त्यांच्या मुलाखतीतून लक्षात आले. त्यातून सर्व साधकांना पुष्कळ शिकायला मिळाले’, यासाठी आम्ही पू. आजींप्रती कृतज्ञ आहोत. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !’ (जुलै २०१८)
(समाप्त)
सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संतांच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे. लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected] पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१ |
|