समाजातील प्रत्येक घटनेकडे वार्ता म्हणून पाहून ती जनप्रबोधनाच्या दृष्टीने सिद्ध केल्यास आपली समष्टी साधना चांगली होईल ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरावर ‘ऑनलाईन वार्ताहर प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन

पू. रमानंद गौडा

मंगळुरू (कर्नाटक) – आज पत्रकारिता समाजातील प्रभावशाली माध्यम झाले आहे. समाजात घडणार्‍या प्रत्येक घटनेच्या माहितीला योग्य असा दृष्टीकोन देणे आणि तो जनमानसापर्यंत पोचवून त्याद्वारे जागृती करणे यांसाठी त्याप्रमाणे वार्ता सिद्ध करणे, हे आज अत्यंत महत्त्वाचे

आहे. त्या माध्यमातून आपली समष्टी साधना होईल. ईश्वरनिष्ठ ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांना नियमितपणे बातमी पोचवण्यासह त्यात वापरलेले शब्द सात्त्विक, व्याकरणदृष्ट्या शुद्ध आणि सुलभतेने अर्थ समजेल, असे असले पाहिजेत. अशा सुंदर वाक्यांची वार्ता पुष्पमालेच्या रूपात गुरुचरणी अर्पण करत आहे, या भावाने बातमी बनवल्यास या सेवेतून आपली साधना होते. त्यासाठी प्रत्येक साधकामध्ये जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती आणि निरीक्षण क्षमता वाढली पाहिजे. त्याचप्रमाणे बातमी बनवण्यासाठी स्वतःची इच्छाशक्ती अधिक असणेही आवश्यक आहे. अशा पद्धतीने केलेल्या सेवेतून आनंद मिळू शकतो. साधकांनी बातमी बनवण्याच्या सेवेविषयी स्वतःमध्ये असलेली उदासीनता दूर करून प्रत्येक घटना, प्रसंग आणि कार्यक्रम यांची बातमी बनवणे, हे आपलेच दायित्व आहे, अशा भावाने प्रयत्न करावा. हे गुण आपल्यात आल्यास प्रत्येक साधक चांगला वार्ताहर होऊ शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन वार्ताहर प्रशिक्षण शिबिरा’त ते मार्गदर्शन करत होते. या शिबिराचा लाभ अनेक साधकांनी घेतला.

​या वेळी सनातन संस्थेचे श्री. काशीनाथ प्रभु आणि सौ. मंजुळा गौडा यांनी साधनेविषयी, तर हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा अन् राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात यांविषयी मार्गदर्शन केले. ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रशांत हरिहर यांनी ‘व्यापक अंगाने बातम्या कशा बनवाव्यात’, याविषयी मार्गदर्शन केले.

क्षणचित्र

​या वेळी उपस्थित शिबिरार्थींनी ‘यापुढे आपण चांगल्या वार्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले.